अनलॉक ४: कर्नाटकात २१ सप्टेंबरपासून आणखी शिथिलता

अनलॉक ४: कर्नाटकात २१ सप्टेंबरपासून आणखी शिथिलता
कर्नाटकात २१ पासून आणखी शिथिलता

बंगळूर: कर्नाटक सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने अनलॉक ४ चे आदेश जारी केले आहेत. ७ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही पब आणि बार उघडण्याबाबत अधिकृत आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, २१ सप्टेंबरपासून काही गोष्टींना मर्यादित परवानगी देण्यात आली आहे.

एमएचएने आपल्या मार्गदर्शक सूचनांमधील पब आणि बार उघडण्यास मनाई केली नसली, तरी कर्नाटक सरकार कमी क्षमतेसह त्या उघडण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांच्या वेगळ्या संचाचा विचार करणार असल्याचे म्हटले आहे. तर बार आणि पब सुरु करण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असे राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी सांगितले. तोपर्यंत बार आणि पब बंद राहतील. तसेच थिएटर, सिनेमा हॉल, उद्याने, जलतरण तलाव इत्यादी बंद राहतील. परंतु, २१ सप्टेंबरपासून ओपन-एअर थिएटरना परवानगी देण्यात येणार आहे.

शाळा व महाविद्यालयेही बंदच राहणार आहे. परंतु, २१ सप्टेंबरनंतर ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्याची परवानगी आहे. 

शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवले जात असताना इयत्ता ९वी ते १२ वीचे विद्यार्थी २१ सप्टेंबरपासून त्यांच्या विद्याशाखेत मार्गदर्शन व मदत घेण्यासाठी त्यांच्या शाळांना भेट देतील. व्यावसायिक प्रशिक्षण संस्था २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास अद्यापही प्रतिबंधित राहील. तर २१ सप्टेंबरपासून थर्मल स्कॅनरसह आवश्‍यक सामाजिक अंतर आणि देखरेखीच्या निकषांसह १०० जणांच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय मेळाव्यांना परवानगी दिली जाईल. निर्बंध शिथिलीकरण केवळ कंटेन्मेंट झोनबाहेर लागू आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत बंदी कायम राहणार आहे.

हे बंद राहणार

  •   थिएटर, सिनेमा हॉल, करमणूक उद्याने, जलतरण तलाव, शाळा व महाविद्यालये, आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास 

२१ सप्टेंबरपासून याला परवानगी

  •      ओपन-एअर थिएटरना परवानगी 
  •       ५० टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा, महाविद्यालयात जाण्यास परवानगी
  •       ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना विद्याशाखेत मार्गदर्शनासाठी परवानगी
  •       व्यावसायिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास अनुमती
  •       १०० जणांसह धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय मेळाव्यांना परवानगी
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com