'व्हाय इंडिया ते व्हाय नॉट इंडिया' ; आगामी २७ वर्षं भारतीयांची स्वप्नं व समर्पणाच्या परीक्षेची

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 20 डिसेंबर 2020

आगामी २७ वर्षांच्या कालावधीत जागतिक पातळीवरील व्हाय इंडिया ते व्हाय नॉट इंडिया या बदलत्या दृष्टीकोनात आगामी काळात भारतीयांची स्वप्ने व समर्पण या दोन्हींची परीक्षाही होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली  :  आगामी २७ वर्षांच्या कालावधीत भारताची जागतिक पटलावरील ठळक भूमिका निश्‍चित होणारच आहे पण जागतिक पातळीवरील व्हाय इंडिया ते व्हाय नॉट इंडिया या बदलत्या दृष्टीकोनात आगामी काळात भारतीयांची स्वप्ने व समर्पण या दोन्हींची परीक्षाही होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. आत्मनिर्भर भारतासाठी देशातील उद्योगांवर सरकारचा सर्वाधिक विश्‍वास आहे, असे म्हणत असताना त्यांनी कृषी क्षेत्रात गेल्या ६ महिन्यांत आपल्या सरकारने केलेल्या सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ देशातील शेतकऱ्याला आता मिळू लागला आहे, असेही सूचकपणे सांगितले. 

असोचेम उद्योग महासंघाच्या शतकमहोत्सवी स्थापना सप्ताहाच्या विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पंतप्रधानांनी संबोधित केले. असोचेमचे सदस्य म्हणून तुम्ही सर्वांनी गेल्या १०० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देऊन कोट्यवधी भारतीयांचे जीवन उन्नत करण्याचे कार्य केले आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की पुढील २७ वर्षांत भारतीय उद्योग या रुपात तुम्हा सर्वांची क्षमता, प्रतिबद्धता व साहसाचे दर्शन जगाला घडविण्याची संधी मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी "संशोधन व विकास'' (आर अँड डी) या पैलूकडेही देशाच्या उद्योग जगतानेही विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे. पंतप्रधान म्हणाले की, जागतिक गुतंवणूकदार यापूर्वी ‘भारत का?'' (व्हाय इंडिया) असे विचारत. मात्र आता ज्या सुधारणा झाल्या व त्याचां प्रभाव दिसू लागला तशी भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी बदलली असून आता जागतिक गुंतवणूकदार भारत का नाही (व्हाय नॉट इंडिया) असे विचारू लागले आहेत.

 

असोचेमचे स्वरुप

  •     १९२० रोजी स्थापना
  •     सध्या ४०० हून जास्त उद्योग संस्था सहभागी
  •     सदस्य : ४ लाख ५० हजारांहून जास्त.

 

रतन टाटा यांचा गौरव

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना पंतप्रधानांच्या हस्ते शतकातील उद्योग (असोचेम एंटरप्राइज ऑफ दी सेंचुरी) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांनी, कोरोना काळात मोदींनी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व केले त्याची प्रशंसा करून सांगितले, की या कामाबद्दल सर्वांनी पंतप्रधानांप्रती कृतज्ञ रहायला हवे, असेही टाटा यांनी नमूद केले.

 

अधिक वाचा :

पश्चिम बंगालच्या निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये फक्त ममताच राहतील ; नऊ आमदार, एक खासदार भाजपमध्ये

 

संबंधित बातम्या