अपग्रेडेशनसाठी चिनी उपकरणे नको

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

दूरसंचार विभाग ‘बीएसएनएल’ला सूचना करणार

नवी दिल्ली

४-जी अपग्रेड करताना चिनी दूरसंचार कंपन्यांची उपकरणे न वापरण्याचा निश्‍चय दूरसंचार मंत्रालयाच्या विभागाने घेतला असून, तशी सूचना लवकरच भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) दिली जाणार आहे. आधीच्या आदेशांचा फेरविचार करण्याच्या धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले.
भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला असताना दूरसंचार विभागाने बदल करण्याचे ठरविले आहे. सीमेवरील तणावामुळे देशभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिक, विविध संस्था आणि ‘सीएआयटी’सारख्या व्यापारी संघटनांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४-जी नेटवर्क अपडेट करण्यासाठी चिनी कंपन्यांची उपकरणे वापरू नका, असे ‘बीएसएनएल’ला सांगण्याचा निर्णय झाला आहे. याबाबतचे कंत्राटही कदाचित पुन्हा काढले जाईल. अशाच प्रकारची सूचना महानगर टेलिफोन निगम लिमिटेडलाही (एमटीएनएल) केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशातील दूरसंचार कंपन्यांनी चिनी मालावरील अवलंबित्व कमी करावे, असे आवाहनही करण्याचा विचार दूरसंचार विभाग करीत आहे. यापूर्वी चिनी उपकरणांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. आज सोशल मीडियावर HindiCheeniByeBye हा हॅशटॅग सर्वाधिक वापरला गेला.

संबंधित बातम्या