भारताला अमेरिकेचे बळ;‘टू प्लस टू’ संवादात चीनला पायबंद घालण्यावर भर

भारताला अमेरिकेचे बळ;‘टू प्लस टू’ संवादात चीनला पायबंद घालण्यावर भर
US external affairs minister

नवी दिल्ली- चीनबरोबरील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने, सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारताच्या सर्व प्रयत्नांना निःसंदिग्ध पाठिंब्याची ग्वाही आज ‘टू प्लस टू’ संवादाद्वारे दिली. तर, भारत-अमेरिकेच्या संयुक्त सहकार्याचा करार अन्य तिसऱ्या देशामध्ये करण्यावर आज सहमती झाली. भारताची क्षेपणास्त्रमारक क्षमता भेदक करण्यासाठी उपयुक्त ‘बेका’ (बेसिक एक्स्चेंज अॅन्ड कोऑपरेशन अॅग्रिमेन्ट) करारावरही आज शिक्कामोर्तब झाले. या करारानुसार भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी लागणारे अचूक भौगोलिक तपशील अमेरिकेकडून मिळतील.  

भारत आणि अमेरिकेच्या बहुचर्चित ‘टू प्लस टू’ संवादामध्ये नियमाधारीत वैश्विक व्यवस्था तसेच खुले आणि मुक्त हिंद-प्रशांत क्षेत्र यावर भर देण्यात आला असला तरी प्रामुख्याने चिनी विस्तारवादाला पायबंद हाच चर्चेचा केंद्रबिंदू राहिल्याचे अमेरिकी मंत्रीद्वयांच्या आक्रमक वक्तव्यातून स्पष्ट झाले. भारताच्या शेजारी देशांशी असलेल्या संबंधावरही यादरम्यान चर्चा झाली आणि सीमेपलिकडून पसरविला जाणारा दहशतवाद कदापी मान्य होणार नाही, असा स्पष्ट इशारा पाकिस्तानला देण्यात आला. 

या संवादानंतर भारत आणि अमेरिकेतर्फे प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये चीनचा उल्लेख नसला तरी वाटाघाटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासमवेत झालेल्या हिंसक झटापटीत २० भारतीय जवानांच्या बलिदानाचा उल्लेख करून अमेरिका भारतासोबत ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले. 

भारत - अमेरिकेतील करार 

    क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी अचूक भौगोलिक तपशील देणारा ‘बेका’ करार
    पृथ्वी निरीक्षण, पृथ्वी विज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार 
    अणुउर्जा क्षेत्रातील भागीदारीसाठी सामंजस्य करार
    टपाल सेवा क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक डेटा आदान प्रदानासाठीचा करार
    आयुर्वेद आणि कर्करोग या क्षेत्रातील संशोधनासाठी करार
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com