फिनसेन: भ्रष्ट लोकांची आणि कंपन्यांच्या माहिती ‘लिक’

US FinCEN names Major Indian banks for suspicious transactions
US FinCEN names Major Indian banks for suspicious transactions

नवी दिल्ली: विविध बॅंकांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांच्या माहितीची कागदपत्रे ‘लिक’ झाली असून, ती नावे उघड झाल्यास मोठी खळबळ उडण्याची शक्‍यता आहे.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाच्या फायनान्शियल क्राइम्स एन्फोर्समेंट नेटवर्ककडे (फिनसेन) ही माहिती असल्याचे समजते. यासंदर्भात एका इंग्रजी दैनिकाने शोधपत्रकारितेच्या मार्गाने अभ्यास करून वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, सुमारे दोन हजारांहून अधिक गुप्त कागदपत्रांच्या छाननीत भारतीयांचे संबंध दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

या कागदपत्रांमध्ये मनी लाँडरिंग, दहशतवादी कारवाया, अमली पदार्थांची देवाणघेवाण आदींसाठीच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची शक्‍यता दिसून आली आहे. या कागदपत्रांच्या आधारे संशयास्पद कारवाया अहवाल (एसएआर) तयार करण्यात आला असून, तो ‘फिनसेन फाइल्स’चा भाग आहे. या कागदपत्रांमध्ये १९९९ ते २०१७ या काळातील काही भारतीय कंपन्या, बॅंका आणि त्यांच्याशी संबंधित घटनांचा उल्लेख आहे. या ‘एसएआर’मध्ये समाविष्ट केलेल्या व्यवहारांचे एकूण मूल्य दोन लाख कोटी डॉलर असल्याचे समजते. 

करचुकवेगिरीसाठी बॅंकिंग
उद्योगपती, राजकारणी आणि त्यांच्या कंपन्यांनी करचुकवेगिरीसाठी बॅंकिंग चॅनेलचा वापर करून आपला पैसा आणि संपत्ती जगाच्या वेगवेगळ्या भागात कशाप्रकारे हलविली आहे, यावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. 

या इंग्रजी वृत्तपत्राने तीन महिन्यांहून अधिक काळ या सर्व अहवालाचा बारकाईने तपास केला आहे. यातील कागदपत्रांमध्ये, ज्यांच्याविरूद्ध भारतातील विविध तपास यंत्रणा काम करीत आहेत, अशा व्यक्तींचा आणि कंपन्यांचा समावेश आहे. भ्रष्टाचार आणि करचुकवेगिरी करण्याच्या प्रकरणांमध्ये अडकलेल्या लोकांचा आणि संस्थांचा उल्लेख ‘फिनसेन’च्या कागदपत्रांमध्ये आहे. त्यात टू-जी गैरव्यवहार, ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरण, रोल्स राईस लाच प्रकरण, एअरसेल-मॅक्‍सिस प्रकरण आहे. 

विशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), अमलबजावणी संचालनालय (इडी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय या यंत्रणांकडून आधीपासूनच तपास सुरू आहे.

भारतातील ४४ बॅंकांचा उल्लेख
अनेक प्रकरणांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीसाठी भारतीय बॅंकांच्या स्थानिक शाखांचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. काही प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी भारतीय बॅंकांच्या परदेशातील शाखांमधील खात्यांचा उपयोग केला गेला आहे. ‘फिनसेन फाइल्स’मध्ये ४४ भारतीय बॅंकांचा उल्लेख झालेला आहे. त्यात प्रामुख्याने पंजाब नॅशनल बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, एचडीएफसी बॅंक, कॅनरा बॅंक, इंडसइंड बॅंक, बॅंक ऑफ बडोदा आदींचा समावेश आहे. एकूण ३२०१ व्यवहार संशयास्पद आहेत, ज्यात पैसे पाठविणारे, घेणारे आणि बॅंका यांचा पत्ता भारतातील आहे.

तस्कर, हिरे व्यापाऱ्यांचाही समावेश
कागदपत्रांमधून समोर आलेल्या नावांमध्ये सध्या तुरुंगात असलेल्या काही तस्करांचा, भारतीय उद्योगपतीच्या जागतिक हिरे कंपनीचा, आरोग्यसेवा आणि आदरातिथ्य क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगसमूहाचा; तसेच दिवाळखोरीत निघालेल्या एका पोलाद कंपनीचा समावेश आहे. याशिवाय अनेक श्रीमंत व्यक्तींची फसवणूक करणारा आलिशान मोटारींचा डीलर, बहुराष्ट्रीय भारतीय कंपनी, आयपीएल संघाचा प्रायोजक, हवाला डीलर आणि अंडरवर्ल्ड डॉनला पैसे पुरविणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com