चार वर्षांनंतर शशिकला तुरुंगाबाहेर

V K Sasikala released from the jail after serving 4 years of sentence
V K Sasikala released from the jail after serving 4 years of sentence

बंगळूर :  तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुकतून निलंबित केलेल्या नेत्या व्ही. के. शशिकला यांचा चार वर्षांच्या कारावासातून बुधवारी सुटका करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शशिकला (वय ६६) या चार वर्षे बंगळूरमधील तुरुंगात होत्या. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शशिकला यांच्याबरोबर नणंद जे. इलावरासी यांनाही गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली असून त्याही ‘व्हिक्टोरिया’त दाखल आहेत. शशिकला यांची अधिकृत सुटका झाल्याची माहिती पारप्पना अग्रहरा तुरुंगाचे कारागृह अधीक्षक व्ही. शेषमूर्ती यांनी सांगितले.

रुग्णालयातील कोरोना वॉर्डात पीपीई किट घालून तुरुंग अधिकाऱ्यांनी सुटकेची सर्व प्रक्रिया पार पाडली. शशिकला यांची सुटका झाली असली तरी कोरोनाच्या नियमांनुसार त्यांना आणखी तीन दिवस रुग्णालयात राहणे बंधनकारक आहे. त्यांच्यातील संसर्गाची लक्षणे आता कमी झाली असून त्या पूर्ण बऱ्या झाल्या आणि ऑक्सिजनची गरज नसल्यास शशिकला यांना शनिवारी (ता. ३० ) घरी सोडण्यात येईल, असे रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

शशिकला यांच्या सुटकेचे वृत्त समजताच रुग्णालयाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. सुटकेचा आनंद त्यांनी मिठाई वाटून साजरा केला. त्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शशिकला यांचे भाचे आणि अण्णा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) संस्थापक आमदार टी. टी. दिनकरन यांनी त्यांची भेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com