संविधानातील मूल्यांचे निष्ठेने पालन व्हावे

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जीवनमूल्ये पवित्र व आदर्श आहेत. आपण सर्वसामान्य नागरिकांनीही या आदर्शांचं, सर्वशक्तिनिशी निष्ठेनं पालन करायला हवे,’ असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  केले.

नवी दिल्ली : ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाच्या मुलभूत जीवनमूल्यांवर सखोल विचार करण्याची एक संधी आपल्याला मिळत असते. संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेली, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जीवनमूल्ये पवित्र व आदर्श आहेत. आपण सर्वसामान्य नागरिकांनीही या आदर्शांचं, सर्वशक्तिनिशी निष्ठेनं पालन करायला हवे,’ असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून त्यांनी भाषण करत जनतेला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात देशवासियांना लोकशाहीला आधार देणाऱ्या मूल्यांची सार्थकता सिद्ध करणे ही प्रत्येक नव्या पिढीची जबाबदारी असल्याचे सांगितले. प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला खाद्यान्न आणि दुग्ध उत्पादनांमध्ये स्वावलंबी बनवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे त्यांनी आभार मानले. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही अनेक आव्हाने आणि कोरोनासारख्या संकटातही आमच्या शेतकरी बंधू-भगिनींनी कृषी उत्पादनांची कमतरता निर्माण होऊ दिली नाही. त्यामुळेच हा कृतज्ञ देश आमच्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.

 

कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या जवानांबद्दल सर्व देशवासीयांना अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, वैज्ञानिकांनीही आपल्या योगदानाने जवळपास सर्वच क्षेत्रांत लोकांच्या जीवनात सुलभता आणल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत कमी कालावधी कोरोना प्रतिबंधक लस तयार करून मानवजातीच्या कल्याणासाठी एक नवा इतिहास रचल्याचे कौतुक राष्ट्रपतींनी केले. कोरोना योद्ध्यांचे आभार मानताना राष्ट्रपतींनी कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

"वेगाने होणाऱ्या आपल्या आर्थिक सुधारणांना पूरक असे नवे कायदे बनवून, कृषी आणि कामगार क्षेत्रांमध्ये असे बदल घडवले गेले आहेत जे खूप आधीपासून अपेक्षित होते. सुरुवातीला या बदलांबाबत काही शंका निर्माण होऊ शकतात, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, यात मात्र तीळमात्र संशय नाही."
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

संबंधित बातम्या