कोरोनातून धडा घेत नव्या जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

vice president of india
vice president of india

नवी दिल्ली, 

कोरोनाच्या काळात नव्या जीवनशैलीचा स्वीकार करत कोरोना महामारीने आपल्याला दिलेल्या धड्यातून बोध घेतला पाहिजे असे सांगून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी 12 सूत्री आराखडाही सुचवला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त काळ हा विषाणू राहण्याची शक्यता असल्यामुळे जीवन आणि मानवतेप्रती  नव्या दृष्टीकोन बाळगण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

लॉक डाऊन 4.0 ची काल रात्री घोषणा झाल्यानंतर आणि निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथिल केल्यानंतर त्यांनी फेसबुकवर 1,539 शब्दांच्या  पोस्टमधे कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या  तात्विक आणि नैतिक मुद्यांचा आणि यापुढे आयुष्य जगण्यासाठीच्या आवश्यक मार्गांवर विवेचन केले आहे. विलग राहून, एकट्याने  जीवन जगता येऊ शकत नाही असे सांगून  या विषाणूच्या प्रादुर्भावाने जीवन परस्परांशी कसे  जोडलेले आहे हे अधोरेखित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका गोष्टीचा एका व्यक्तीवर प्रभाव पडत असेल तर सर्वाना  सर्व ठिकाणी त्याचा प्रभाव जाणवतो मग तो आजार असो किंवा अर्थव्यवस्था.

कोरोना पूर्वीच्या आयुष्यात,आनंद आणि भौतिक प्रगतीच्या शोधात माणूस कुटुंब आणि समाजाला दुय्यम लेखत एकाकी होत चालला होता. इतरांच्या जीवनाचा विचार न करता  आपण एकटे जगू शकतो, असा घमेंडीकडे झुकणारा आत्मविश्वास  त्याला वाटत होता.

तर कोरोना नंतरच्या आयुष्याबद्दल लिहिताना, स्वतःसाठी जगणाऱ्या मानवाची आत्मकेंद्री जीवनशैलीच या विषाणूने दोलायमान झाली , निसर्ग आणि  मानवाशी  सलोखा राखत जगण्याची आवश्यकता अधोरेखित केली असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. या  जीवजंतूने, आयुष्य अगदी झपाट्याने बदलू शकते हे पुन्हा सिध्द केले.

या महामारीने जीवनाचा अर्थ आणि उद्देश याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. या विषाणूने समाजात  विकासा बरोबरच असणारी आर्थिक विषमताही अधोरेखित केली आहे.

माणसाच्या मनात अनिश्चिततेने ठाण मांडले असून अनिश्चितता हे चिंतेचे मूळआहे आणि त्यामुळे मानसिक प्रश्नाकडे वाटचाल होऊ शकते. हे मुद्दे कसे हाताळायचे? शांत राहायचे,आश्वस्त राहून नव्या नित्याच्या जीवनाचा अंगीकार करायचा असे त्यांनी सांगितले आहे.

मानवाच्या अस्तित्वासाठीच्या, जीवनासाठीच्या शक्यतांचे संवर्धन करणे हे कोणत्याही  संस्कृतीचे उद्दिष्ट असते. कोरोना केवळ वैयक्तिक नव्हे तर संस्कृती विषयक आव्हान आहे. सध्याच्या  संस्कृतीचे  रक्षण करण्यासाठी नवे मापदंड आणि मुल्ये  विकसित करायला हवीत यावर त्यांनी भर दिला.

फार काळ बंदिस्त जीवन जगता येत नाही असे सांगून लॉक डाऊन 4.0 मधून  काही बाबींसाठी आलेल्या शिथिलतेचे त्यांनी स्वागत केले.एचआयव्ही विषाणूसाठी लस नसल्याने सवयीत बदल करत त्यासमवेत  जीवन सुरु ठेवणाऱ्याकडे  लक्ष वेधत आपल्या सवयीत, जीवन आणि  सर्वांशी  वागण्याच्या वृत्तीत बदल घडवत कोरोना विषाणू समवेत जीवन जगण्याचे लोकांनी शिकावे असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनाच्या काळात जीवन जगण्यासाठी त्यांनी 12 सूत्र सांगितली. निसर्ग आणि मानवाशी साहचर्य, आपल्या जीवनाची सुरक्षितता परस्परांवर अवलंबून आहे,प्रत्येक पावलाचा या विषाणूच्या प्रादुर्भावावरकाय परिणाम होईल हे जाणणे,मास्कचा वापर,वैयक्तिक स्वच्छता,शारीरिक अंतर राखणे, उपचार करण्यासाठी बाधितांना प्रेरित करताना त्यांच्या विरोधात पूर्वग्रह न बाळगणे, नागरिकांना संसर्गासाठी दोषी मानणारा  भ्रामक प्रचार समाप्त करणे,निराशेच्या जागी  आपण परस्परांवर अवलंबून आहोत याचा विश्वास  निर्माण करणे यांचा यात समावेश आहे.

माध्यमांनी या विषाणूबाबत अचूक आणि वैज्ञानिक माहितीचाच प्रसार करावा असे आवाहन त्यांनी केले. लोकांनी बदलत्या जीवनशैली सह सुरक्षित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com