कोची बंदरातील यशस्वी चाचण्यांनंतर समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

कोचीन बंदरातील विक्रांतच्या चाचण्या कालच यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून केव्हाही तिच्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील.

मुंबई- भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे. 

कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या कालच यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून केव्हाही तिच्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील. ‘विक्रांत’, ‘विराट’ या इंग्लिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्यावर भारतीय नौदलाचा भार आता ‘विक्रमादित्य’ ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका वाहत आहे. 

कोचीन नौदल गोदीत बनवली जात असलेली ‘विक्रांत’ ही सुमारे चाळीस हजार टनी पहिलीवहिली स्वदेशी युद्धनौका आता विक्रमादित्यच्या जोडीला येत आहे. नुकतीच निवृत्त झालेली पहिली इंग्लिश बनावटीची विमानवाहू युद्धनौका विक्रांतवरूनच हिचे नामकरण विक्रांत केले आहे. 
युद्धनौकेची बांधणी जवळपास पूर्ण झाली असून, कोचीन बंदरात तिच्या चाचण्या घेण्यात आल्या. युद्धनौकेचे इंजिन, वीजनिर्मिती आणि वितरण यंत्रणा व्यवस्थित काम करीत असल्याचे नौदलाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

चीनच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर ‘विक्रांत’मुळे भारतीय नौदलाला बळ मिळणार आहे.

संबंधित बातम्या