मुंगेरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

 बिहारच्या मुंगेर शहरात गुरुवारी पुन्हा हिंसाचार भडकला. संतप्त जमावाने वासुदेवपूर पोलिस चौकीला आग लावली. पोलिस अधिक्षकाच्या घरावरही हल्ला झाला. यात पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची तातडीने बदली केली.

पाटणा :  बिहारच्या मुंगेर शहरात गुरुवारी पुन्हा हिंसाचार भडकला. संतप्त जमावाने वासुदेवपूर पोलिस चौकीला आग लावली. पोलिस अधिक्षकाच्या घरावरही हल्ला झाला. यात पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची तातडीने बदली केली.

दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी दंगली दरम्यान पोलिसांना जमावाला आवरताना गोळीबार करावा लागला होता. यावेळी जमावावर लाठीहल्ला देखील करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ २८ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर या भागामध्ये पुन्हा हिंसाचार भडकला होता. पोलिस अधिक्षक लिपी सिंह यांच्यावर आंदोलकांचा राग आहे. येथील हिंसाचार थांबावा म्हणून निवडणूक आयोगाने पोलिस अधिक्षकांसह, जिल्हाधिकारी राजेश मीणा यांनाही हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेलिकॉप्टरने अधिकारी रवाना
येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस महासंचालक मनू महाराज यांना आज पोलिस दलासह मैदानात उतरावे लागले. आता पोलिस अधिक्षक म्हणून मानवजितसिंग धिल्लाँ आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून रचना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुंगेरला पोचले. जिल्हाधिकारी हे सध्या निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याने ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून येथे आले. या हिंसाचारामुळे मुंगेरनजीकच्या भागामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या