अनलॉक 2.0 साठी योजना आखायची आहे : पंतप्रधान

Pib
गुरुवार, 18 जून 2020

भारतात एक लाख लोकसंख्येमागे बाधितांची आणि मृतांची संख्या ही जगातील सर्वात कमी बाधित असणाऱ्या देशांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक  1.0  नंतरच्या परिस्थितीबद्दल आणि कोविड -19 महामारीचा सामना करण्याबाबत  पुढील रणनीती आखण्यासाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यक्रमांतर्गत  आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

काही विशिष्ट  मोठ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.  दाटीवाटीची लोकसंख्या , शारीरिक अंतर राखण्यात अडचण आणि मोठ्या संख्येने लोकांची दररोज ये-जा यामुळे परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे, मात्र तरीही नागरिकांचा संयम, प्रशासनाची सज्जता  आणि कोरोना योद्धयांच्या समर्पणामुळे प्रसार नियंत्रणात ठेवण्यात आला आहे. वेळेवर शोध, उपचार आणि नोंद केल्यामुळे  बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की लॉकडाऊन दरम्यान लोकांनी दाखवलेल्या शिस्तीमुळे विषाणू गुणाकाराने वाढण्यास प्रतिबंध करणे शक्य झाले.

आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ

आव्हानांची पूर्तता करण्यासाठी आरोग्याच्या उत्तम पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भाष्य केले. पीपीई आणि मास्कच्या देशांतर्गत  उत्पादन क्षमतेतील वाढ , निदान किटची पुरेशी उपलब्धता, पीएम केअर्स निधीचा वापर करून  भारतात बनवलेल्या व्हेंटिलेटरचा पुरवठा, चाचणी प्रयोगशाळांची उपलब्धता, लाखो कोविड विशेष खाटा , हजारो अलगाव आणि विलगीकरण  केंद्र, आणि प्रशिक्षणाद्वारे पुरेसे मनुष्यबळ त्यांनी अधोरेखित केले. आरोग्यविषयक  पायाभूत सुविधा, माहिती प्रणाली, भावनिक आधार आणि लोकसहभाग यावर सातत्याने भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कोविड बाधित लोकांना त्वरित शोधून काढणे, त्यांचा मागोवा घेणे आणि बाधितांना वेगळे ठेवण्यासाठी चाचणीच्या महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला. सध्याच्या चाचणी क्षमतेचा पूर्ण वापर केला जावा, त्याचबरोबरीने क्षमता विस्तारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे  ते म्हणाले. त्यांनी टेलिमेडिसिनच्या लाभांचा उल्लेख केला आणि अनुभवी डॉक्टरांची मोठी पथके तयार करण्याची गरज व्यक्त केली , जी टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आजारी व्यक्तींना मार्गदर्शन करू शकतील, त्यांना योग्य माहिती देऊ शकतील. याशिवाय, हेल्पलाईनद्वारे जनतेला वेळेवर योग्य माहिती पुरवण्यासाठी युवा  स्वयंसेवकांची फौज देखील तयार करावी  जी  प्रभावीपणे हेल्पलाइन चालवू शकतील अशी सूचना त्यांनी केली.

भीती आणि कलंकाशी लढा

ज्या राज्यांमध्ये आरोग्य सेतु App मोठ्या संख्येने डाउनलोड झाले आहे तिथे खूपच सकारात्मक परिणाम प्राप्त झाल्याचे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.  आरोग्य सेतु App जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे,यासाठी  सातत्याने प्रयत्न केले जावेत असे ते म्हणाले. पावसाळ्यात उद्‌भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांप्रति जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोरोना विरुद्ध या लढाईचा एक भावनिक पैलू देखील असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संसर्गाची भीती , याच्याशी संबंधित कलंक दूर करण्यासाठी कोरोनामुक्त  झालेल्यांच्या वाढत्या संख्येबाबत लोकांना सजग बनवणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. आपले कोरोना योद्धे , डॉक्टर्स , आरोग्य कर्मचारी यांना मदत करण्याला आपले प्राधान्य असायला हवे.या लढ्यात लोकसहभाग आवश्यक असून  मास्क किंवा चेहरा झाकणाऱ्या रुमालाचा वापर, शारीरिक अंतर आणि स्वच्छतेबाबत लोकांना वारंवार आठवण करून देण्याची सूचना त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय

दोन दिवसीय संवादाचा आजचा दुसरा भाग होता. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली , गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर , तेलंगणा आणि ओदिशा ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्त्वाबद्दल आभार मानले आणि राज्यातील वास्तव परिस्थिती आणि विषाणूच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी त्यांची तयारी याबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. आव्हानांची पूर्तता करण्यासाठी आरोग्याच्या उपलब्ध पायाभूत सुविधांविषयी आणि त्या अधिक बळकट करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, आघाडीवरच्या कामगारांना देण्यात आलेले सहाय्य , प्रतिबंधात्मक क्षेत्रात देखरेख , मास्क वापरण्यास आणि अन्य सुरक्षाविषयक खबरदारी घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या मोहिमा , चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आणि परप्रांतातून परत आलेल्या मजुरांना  उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी माहिती दिली.

अनलॉक 2.0

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. विषाणूंविरूद्ध लढण्याची सामूहिक बांधिलकी आपल्याला विजयाकडे नेईल असेही त्यांनी नमूद केले, तसेच विविध ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन आर्थिक घडामोडीना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लॉकडाउनच्या अफवांविरोधात लढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले . ते  म्हणाले की, देश आता अनलॉकिंगच्या टप्प्यात आहे. आता अनलॉकचा दुसरा टप्पा आणि आपल्या लोकांचे नुकसान होण्याची  शक्यता कशी कमी करता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्बंध शिथिल केल्यामुळे आर्थिक कामगिरीचे निर्देशक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे दर्शवत आहेत. महागाई देखील नियंत्रणात ठेवली गेली आहे असे त्यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा आणि बांधकाम संबंधित कामांना चालना देण्यासाठी राज्यांनी पावले उचलावी असे आवाहन त्यांनी केले. एमएसएमई, शेती आणि कृषी विपणनाला भरारी देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अंतर्गत उचलण्यात आलेल्या पावलांची यादी त्यांनी दिली.  आगामी महिन्यांमध्ये स्थलांतरित मजुरांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सतर्क राहण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विषाणू विरूद्धच्या आपल्या लढाईत आतापर्यंत आपण बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत, परंतु लढाई अजून संपलेली नाही . आपण अनलॉक करायला सुरवात करतानाच आपण सतर्क देखील राहिले पाहिजे हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती केली की संरक्षणासाठी स्वतःची ढाल म्हणून  आरोग्य सेतू ऍप्प डाऊनलोड करायला प्रोत्साहन दिले जावे.

आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी यांनी लॉकडाउनच्या टप्प्यांत आणि त्यानंतर अनलॉक 1.0 दरम्यानच्या काळात रुग्णवाढीच्या संख्येत सातत्याने घट झाल्याचे  नमूद केले. त्यांनी लॉकडाऊनच्या सकारात्मक परिणामांविषयी  माहिती दिली. कोरोना बाधितांची संख्या वाढण्याला अटकाव, अनेकांचे जीव वाचवण्यात यश , जनजागृती  आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ यांचा यात समावेश होता. 

संबंधित बातम्या