देशभरात ‘रेल रोको’ करू: आंदोलक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

सरकारने मागण्या मान्य केल्यास देशभरात रेल्वे रोको करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी आज दिला.

नवी दिल्ली: कृषी कायद्यांच्या विरोधात गेले १५ दिवस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेचे आवतण सरकारने पुन्हा दिले असतानाच शेतकरी संघटना मात्र तिन्ही कायदे रद्द करा, या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्यास देशभरात रेल्वे रोको करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी आज दिला.

सरकारचे लेखी प्रस्ताव कालच फेटाळणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आजच्या बैठकीनंतर सांगितले की, आम्ही सरकारला कायदे रद्द करण्यासाठी दहा डिसेंबरची मुदत दिली होती. पण सरकारची आठमुठी भूमिका आहे. सरकारने आमची मागणी ऐकली नाही व कायदे रद्द केले नाहीत तर, लवकरच साऱ्या भारतातील रेल्वे रूळांवरही धरणे आंदोलने सुरू करू. सारी रेल्वेवाहतूक ठप्प पाडली जाईल, असा कडक इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. संयुक्त शेतकरी संघर्ष समिती लवकरात लवकर देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलनाच्या तारखेची घोषणा करेल असेही सांगण्यात आले.

शेतकऱ्यांची एकजूट भक्कम

थंडीचे दिवस व कोरोना महामारीमुळे सरकारला आंदोलनाबाबत कळवळा वाटल्याचे दाखवले जाते त्याबद्दल शेतकरी नेत्यांनी रोष व्यक्त केला. तसेच, सरकारतर्फे जे लेखी प्रस्ताव दिले होते त्यात वेगळे काहीही नाही. सरकार कायदेदुरूस्त्या करू म्हणते व शेतकरी त्यासाठी अजिबात तयार नाहीत. तिन्ही कायदे रद्द करण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. शेतकऱ्यांची एकजूट भक्कम आहे, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या