मोदी आपल्या ट्विटमधून नितीश कुमारांना नेमका कोणता संदेश देऊ पाहताहेत?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर घसरणाऱ्या जदयूसाठी एक महत्वाचा संदेश मोदींच्या ट्विट्समध्ये लपलेला आहे.    

पाटणा- बिहार निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपने पुन्हा एकदा बिहारमध्ये आपला करीश्मा दाखवला आहे. पंतप्रधान मोदी यांनीही आनंद व्यक्त करत ट्विट करताना बिहारच्या जनतेने जगाला लोकशाहीचा धडा शिकवल्याचे म्हटले आहे.  काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीबद्द्लही त्यांनी आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर घसरणाऱ्या जदयूसाठी एक महत्वाचा संदेश त्यांच्या या ट्विट्समध्ये लपलेला आहे.    

मोदींनी ट्वीट्समध्ये नेमके काय म्हटले आहे?  

पंतप्रधान मोदी यांनी बिहारसाठी एक नव्हे दोन नव्हे तब्बल ६ ट्विट्स केले आहेत. यात ते म्हणतात, 'बिहारच्या जनतेने विकास हीच त्यांची प्राथमिकता असल्याचे दाखवून दिले आहे. बिहारच्या तरूणांनी हे दशक बिहारचेच असेल हे स्पष्ट केले आहे. मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या बहिणी-मुलींनीही दाखवून दिले की बिहारमध्ये त्यांची भूमिका किती मोठी आहे.'

ट्विटमध्ये पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, 'बिहारने दुनियेला लोकशाहीचा नवीन मंत्र दिला आहे. आज बिहारने दाखवून दिले आहे की लोकशाहीला कसे मजबूत केले जाते. बिहारमधील गरीब, वंचित, महिलांनी विक्रमी संख्येने मतदान केले आणि विकासासाठी आपला निर्णायक फैसला सुद्धा दिला आहे.  बिहारच्या प्रत्येक मतदाराने तो किती महत्वकांक्षी आहे हे स्पष्ट केले असून १५ वर्षांनंतरही एनडीएच्या सुशासनाला आशीर्वाद दिला आहे.    

मोदी यांनी निवडणूक झालेल्या त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना आपल्या ट्विटमध्ये टॅग केले किंवा किमान त्यांची नावे तरी घेतली. उत्तर प्रदेश राज्याच्या ट्विटमध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ, मध्ये प्रदेशच्या ट्विटमध्ये शिवराज सिंह चौहान, गुजरातच्या ट्विटमध्ये विजय रूपाणी, कर्नाटकच्या ट्विटमध्ये बीएस येदियुरप्पा आणि मणिपूरच्या ट्विटमध्ये बीरेन सिंह यांना टॅग केले. मात्र, बिहारच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर त्यांनी जे ट्विट केले त्यात नितीश कुमार यांना टॅग केले नाही किंवा त्यांचा नामोल्लेखही ट्विटमध्ये त्यांनी कुठेच केला नाही. एवढेच नव्हे तर त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या जदयूचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही.     

राज्यात भाजपने जदयुला मागे सारत निवडणुकीत चांगलीच  आघाडी घेतली. नितीश कुमार यांचा जदयू पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. एनडीए गठबंधनमध्ये जदयू पेक्षा जास्त मते भाजपला मिळाली आहेत. यावरून नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा संशय राजकीय वर्तूळात व्यक्त केला जात आहे. भाजपने मात्र, नितीश कुमारच आमचे मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले असले तरीही पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विट्समधून वेगळे संकेत मिळत आहेत.  

संबंधित बातम्या