वाट पहाते मी.....

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली असून मतमोजणी पूर्ण न झाल्याने विजयाचा अंदाज स्पष्टपणे आलेला नाही. त्यामुळे अमेरिकेचा अध्यक्ष कोण असेल, ही उत्सुकता ताणली गेली आहे. 

वॉशिंग्टन : अनेक वादांनी भरलेल्या, आरोप-प्रत्यारोपांनी रंगलेल्या, कोरोना काळातही विक्रमी मतदान झालेल्या, मतांचे ध्रुवीकरण झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अनिश्‍चितता अद्यापही संपलेली नाही. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली असून मतमोजणी पूर्ण न झाल्याने विजयाचा अंदाज स्पष्टपणे आलेला नाही. त्यामुळे अमेरिकेचा अध्यक्ष कोण असेल, ही उत्सुकता ताणली गेली आहे. 

अखेरीस हाती आलेल्या वृत्तानुसार, एकूण मते आणि इलेक्टोरल मते (ज्यांना मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले) यात ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा थोडी आघाडी घेतली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक्सास, फ्लोरिडा, ओहियो या प्रमुख राज्यांमध्ये विजय मिळविल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे तर बायडेन यांनी कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, ॲरिझोना आणि इलिनॉइस ही राज्ये खिशात घातल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ५० राज्यांपैकी ४१ राज्यांमध्ये प्राथमिक निकाल जाहीर झाले आहेत. सध्याच्या चित्रानुसार, बायडेन यांनी २३८ इलेक्टोरल मते मिळविली आहेत, तर ट्रम्प यांच्याकडे २१३ इलेक्टोरल मते आहेत. एकूण ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मते मिळविणारा उमेदवार अमेरिकेचा अध्यक्ष होईल. 

येथील निकाल बाकी
अलास्का, ॲरिझोना, जॉर्जिया, मिशीगन, माइने, नेवादा, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वानिया, विस्कॉन्सिन

सिनेटसाठीही मतदान 
अध्यक्षपदाबरोबरच अमेरिकेत सिनेट आणि लोकप्रतिनिधीगृहासाठीही (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) मतदान झाले. सिनेटमध्ये १०० सदस्य असतात तर लोक प्रतिनिधीगृहात ४३५ सदस्य असतात. या दोन्ही सभागृहांत आपल्या पक्षाचे वर्चस्व असले तरच अध्यक्षांना पूर्ण क्षमतेने आपल्या अधिकारांचा वापर करता येतो. या दोन्ही सभागृहांसाठीही तुल्यबळ लढत होत आहे.

संबंधित बातम्या