आरोग्य सुविधांत सुधारणा का नाहीत?

वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

विरोधकांनी उडविल्या सरकारच्या धोरणाच्या चिंध्या

नवी दिल्ली:  ‘‘कोरोना महामारीच्या मुकाबल्यासाठी सरकारची काहीही तयारी नसून लॉकडाउनमुळे सरकारला तोंड लपविण्याचा बहाणा मिळाला. 

लॉकडाउनच्या काळात देशातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा का नाही केली,’’ अशा शब्दांत विरोधी पक्षांनी कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठीच्या सरकारी व्यवस्थापनावर लोकसभेमध्ये कडाडून हल्ला चढविला. 

लोकसभेमध्ये कोरोनाच्या संकटावर नियम १९३ अन्वये झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी सरकारच्या धोरणाच्या चिंध्या 
उडवल्या.

सुविधा का नाही वाढविल्या?
द्रमुक नेते दयानिधी मारन यांनी, लॉकडाउनचा लाभ घेऊन सरकारने आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा का वाढवल्या नाहीत? असा सवाल केला. बहुतांश राष्ट्रांनी लॉकडाउनमुळे बेरोजगारांना ८० टक्के वेतन दिले. 

भारतात मात्र वेतनकपात झाली आणि अनेकांना रोजगार गमवावे लागले. तसेच कोरोना संक्रमण पसरण्यावरून तबलिगी जमातच्या नावाखाली मुस्लिमांना लक्ष्य करण्यात सरकारने धन्यता मानली अशी तोफ मारन यांनी डागली.

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी, कोरोना विरुद्ध लढण्यासाठी फक्त पंतप्रधान मोदींना श्रेय देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या कोरोना योद्ध्यांना श्रेय द्या, असा टोला लगावला.

अर्थव्यवस्था भुईसपाट
काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, राज्यांशी चर्चाच न करता ३ आठवड्यांचा लॉकडाउन तडकाफडकी लावण्यात आला. पंतप्रधानांनी महाभारतातील १८ दिवसांचे उदाहरण देत २१ दिवस मागितले होते. आता १८० दिवसांनी भारत कोरोना रुग्णसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोविडमुळे अर्थव्यवस्था भुईसपाट झाली. 

उपाययोजना फोल
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्र सरकार कोरोना संकटाशी झुंज देत असताना केंद्राकडून सहकार्याची मागणी केली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र सरकार कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असताना केंद्राने पीपीई किट, टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर पुरवठा रोखला असल्याचा आरोप केला. 

राहुल यांच्यावर टीका
भाजप खासदार डॉ. किरीट सोलंकी यांनी सरकारची बाजू मांडताना पंतप्रधान मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळेच कोरोना संक्रमण रोखण्यासाठी झटपट उपाययोजना झाल्या. ‘ट्विट’ करून मोदींवर टिका करणारे राहुल गांधी संसद अधिवेशनात हजर का नाहीत, असा सवाल सोलंकी यांनी केला. 

संबंधित बातम्या