नवी दिल्ली: दिल्लीच्या टिकरी, सिंघू व इतर सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयुक्त संघर्ष समितीच्या ३५ नेत्यांनी आज सकाळी व सायंकाळी दोनदा बैठक घेतली. त्यात आंदोलन पुढे नेण्यावर विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीत मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, संदीप गिड्डे पाटील या महाराष्ट्रातील नेत्यांनीही आपली मते मांडली.
दरम्यान, केंद्र सरकारकडून विज्ञान भवनातील बैठकीत जे भावनात्मक प्रयत्न केले गेले त्यामुळेही शेतकरी नेत्यांमध्ये नाराजी आहे. जर गृहमंत्री अमित शहा यांच्या फोनवरून कालची बैठक बोलावली होती तर त्या बैठकीला ते का आले नाहीत. ज्यांच्या हाती निर्णयाचे अधिकार नाहीत त्या मंत्र्यांना का पाठविले, असाही शेतकरी नेत्यांचा सवाल आहे.
शेतकरी नेते दर्शन पाल, जगजितसिंग दल्लेवाल, गुरुनामसिंग चढूनी व शिवकुमार कक्काजी यांनी बैठकीनंतर सांगितले, की मंगळवारच्या बैठकीत सरकारकडून फूट पाडण्याचे प्रयत्न केले गेले. हे थांबले पाहिजे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांचा सत्यानाश करणारे असून ते रद्द करावेत, या मागणीवर ठाम आहोत. उद्याच्या बैठकीत सरकारकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे. तडजोडीसाठी हात पुढे केला आहे व आता सरकारच्या हाती प्रतिसाद देणे आहे. जर सरकारची भूमिका ताठर राहिली तर ५ डिसेंबरपासून देशभरात चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले. त्यांनी सांगितले, की हे फक्त पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याचे व त्यालाही विशिष्ट रंग देण्याचे जे प्रयत्न व प्रचार सरकारकडून सुरू आहे आणि तो नामंजूर आहे. फक्त विशिष्ट संघटनेच्या शेतकरी नेत्यांना चर्चेला बोलवायचे हेही सरकारने थांबविले पाहिजे,
असा इशारा देऊन पाल म्हणाले की पंजाब हरियानाच नव्हे तर संपूर्ण देशभरातील शेतकरी संतप्त आहे. योगेंद्र यादव यांच्याबद्दल काल सरकारकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामागे एक वरच्या फळीतील मंत्री असल्याची शंका आम्हाला आहे, असे ते म्हणाले.
माल वाहतूकदारांचा इशारा
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मालवाहतूकदार संघटनेने ८ डिसेंबरपासून देशव्यापी बेमुदत संपाची हाक दिली. मोटार वाहतूक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुलतारनसिंग अटवाल यांनी सांगितले, की आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करत असून सर्वांत आधी उत्तर भारतातील मालवाहतूक थांबविण्यात येईल.
भीषण वाहतूक कोंडी
- दिल्लीसह एनसीआरमध्येही वाहतुकीची महाकोंडी होत आहे.
- राष्ट्रीय महामार्ग २४ सह बदरपूर व पलवल सीमांवरही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
- वाहनांची तपासणी सुरू केल्याने वाहतूक कोंडीत भर
- दिल्लीकरांना आजही दिवशी संध्याकाळी रस्त्यातच अडकून पडावे लागले.
- नोएडा-चिल्ला-कालिंदी कुंज-टिकरी, हरियाना सीमाभाग आदी रस्ते टाळून जाण्याचा सल्ला
उत्तर प्रदेशचे शेतकरीही धडकले
पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आज सकाळीच चिल्ला सीमेवर धडक दिल्याने नोएडाकडे जाणाऱ्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. सीमेच्या दोन्ही बाजूंना किमान ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर नोईडा महामार्गावरील एक बाजू काही वेळासाठी खुली करण्यात आली. टीकरी भागातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्राच्या ताठर भूमिकेमुळे चिघळणारे आंदोलन व त्यामुळे दिल्ली व हरियानाच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली.
आणखी वाचा: