केंद्र सरकार लशीसंदर्भात करणार चर्चा

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

कोरोना साथीवर विकसित केली जाणारी लस, या लशीचे वितरण या व करोनाशी निगडित अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे ४ डिसेंबर (शुक्रवारी) रोजी सर्वपक्षीय संसदीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

नवी दिल्ली : कोरोना साथीवर विकसित केली जाणारी लस, या लशीचे वितरण या व करोनाशी निगडित अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे ४ डिसेंबर (शुक्रवारी) रोजी सर्वपक्षीय संसदीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आभासी राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेता थेट जानेवारीच्या अखेरीस अर्थसंकल्पी अधिवेशन घेण्याचे सरकारने जवळपास निश्‍चित केल्याचे मानले जात आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कडक हिवाळ्यामुळे या कोरोना साथीची लागण अधिक होण्याच्या अंदाजाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेतली जात आहे. यामध्ये संसदेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाकडे याबाबतच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

कोरोना प्रतिबंधक लस देशात विविध प्रयोगशाळांकडून विकसित केली जात आहे. त्यासंदर्भात पंतप्रधानांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या तर सुमारे तीन प्रयोगशाळांबरोबर त्यांनी संगणकीय संवादाद्वारे माहिती घेतली. पुढील वर्षाच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात लस उपलब्ध होण्याचे दावे केले जात आहेत. त्या दाव्यांच्या आधारे पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संगणकीय संवाद साधून या लशीच्या वितरणाची आणि लसीकरणाच्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्याची सूचना केली होती. लसीकरणासाठी प्राधान्य-गट तयार करण्याची सूचनाही केली. यामध्ये कुणाला अग्रक्रमाने लसीकरणाची आवश्‍यकता आहे, हे शोधण्याची मोहीम राज्य सरकारांनी हाती घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. 

तीन पथकांशी मोदींचा संवाद
कोरोनावरील लशीच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या तीन पथकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल संवाद साधला. लशींबाबत सर्वसामान्यांना परवडेल अशा भाषेमध्ये माहिती देण्यासाठी अधिक मेहनत घ्या, अशी सूचना मोदी यांनी या संशोधकांना केली.

मंजुरीसाठी ‘मॉडर्ना’चा अर्ज
वॉशिंग्टन : कोरोनावरील लसनिर्मितीत आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी मॉडर्ना या कंपनीने अमेरिका आणि युरोपमध्ये लशीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. ‘मॉडर्ना’ने चाचणीच्या अंतिम टप्प्याचा अहवाल प्रसिद्ध केला असून लस ९४.१ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. या लशीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 

आणखी वाचा:

इंडोनेशियामधील इले लेवोटोलोक ज्वालामुखी झाला जागृत -

बेळगावचे सौंदत्ती यल्लम्मा मंदिर ३१ डिसेंबरपर्यंत बंद -

संबंधित बातम्या