कर्नाटकात पुन्हा सत्ता मिळवू

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

डी. के. शिवकुमार : केपीसीसी अध्यक्षपदाची स्वीकारली सूत्रे

बंगळूर

कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह राज्यातील लोकांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. मी अध्यक्ष असलो तरी मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून उभा आहे. कर्नाटकासह केंद्रात कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे नूतन अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली.
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी (ता. 2) बंगळुरात केपीसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. "प्रतिज्ञा दिन' म्हणून जाहीर केलेल्या या कार्यक्रमाला राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ, प्रभाग आणि ग्रामपंचायत स्तरावरुन हजारो कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ऑनलाईन सहभाग दर्शविला. मावळते अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांच्याकडून शिवकुमार यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमारे 14 हजार ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले.
सकाळी शिवकुमार यांनी केपीसीसी मुख्यालयाबाहेर ध्वजारोहण केले. अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षाशी एकनिष्ठतेची प्रतिज्ञा केली. त्यात सर्व नेते व कार्यकर्तेही सहभागी झाले. मी तुरुंगात असताना पक्षाच्या नेत्यांनी मला बळ दिले. पक्ष माझ्यामागे उभा राहिल्यानेच मी आज इथे उभा आहे. सामूहिक नेतृत्त्वावर माझा विश्वास आहे, असे सांगतानाच त्यांनी सर्व समाजाच्या नेत्यांचे व कॉंग्रेस नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला बेळगावातून ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या.

सोनिया गांधींकडून कौतुक
एआयसीसीचे सरचिटणीस आणि कर्नाटक प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी एआयसीसीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश वाचून दाखविला. शिवकुमार यांची पक्षनिष्ठा वादातीत आहे. स्वत:वर संकट येऊनही ते पक्षाच्या बाजूने उभे राहिले, असे सांगतानाच कोरोना काळात तंत्रज्ञानाचा वापर करुन कार्यकर्त्यांना एकत्र आणणाऱ्या डिजिटल कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. एआयसीसीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शिवकुमार यांना मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या