काश्मीर खोऱ्याने पांघरली मखमली बर्फाची चादर..

PTI
सोमवार, 4 जानेवारी 2021

काश्मीरमधील बहुतेक भागात रविवारी हिमवृष्टीमुळे बर्फाची चादर पसरली होती. त्यामुळे, खोऱ्याचा उर्वरित देशाशी रस्ते व हवाईमार्गेही संपर्क तुटला.

श्रीनगर :   काश्मीरमधील बहुतेक भागात रविवारी हिमवृष्टीमुळे बर्फाची चादर पसरली होती. त्यामुळे, खोऱ्याचा उर्वरित देशाशी रस्ते व हवाईमार्गेही संपर्क तुटला. शनिवारी रात्री सुरू झालेली हिमवृष्टी काही ठिकाणी रविवारी सकाळपर्यंत सुरू होती. उत्तर काश्मीरमधील काही भागात हलकी तर मध्य व दक्षिण काश्मीरमध्ये मध्यम स्वरुपाची हिमवृष्टी झाली. 

या हिमवृष्टीमुळे श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जवाहर बोगदा परिसरात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाल्याची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाने दिली. श्रीनगर विमानतळालाही हिमवृष्टीचा फटका बसला.  जम्मू आणि काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये तापमान अजूनही गोठणबिंदूच्या खाली आहे.श्रीगरमध्ये उणे १.५ तर गुलमर्गमध्ये उणे ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पहेलगाममध्येही उणे १.५अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हवामान खात्याने जम्मू-काश्मीरमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार हिमवृष्टीचा इशारा दिला आहे.

पंजाब, हरियाणात पावसाची हजेरी

पंजाब, हरियानात रविवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, दोन्ही राज्यांतील किमान तापमानात वाढ झाली. चंदिगडसह अंबाला, कर्नाल, रोहतक, अमृतसर आदी ठिकाणी पाऊस पडला. हवामान खात्याने पंजाब, हरिनायात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हिसार, रोहतक, भिवानी, लुधियानात धुक्याची चादर पसरली होती. चंदिगडमध्ये ११.४ तापमानाची नोंद झाली. त्याचप्रमाणे, अमृतसर, लुधियाना, पातियाळातही किमान ११ अंश तापमान नोंदविले गेले. 

संबंधित बातम्या