लॉकडाउनच्या काळातही महिला आयोग सक्रिय

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

गतवर्षीच्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण कमी

नवी दिल्ली

लॉकडाउनच्या काळात कौटुंबिक हिंसाचार आणि अन्य त्रासाला वाच्यता फोडण्यासाठी महिला आणि युवतींनी स्वत:हून पुढे यावे, यासाठी दिल्लीच्या महिला आयोगाने हेल्पलाइनसंदर्भात जनजागृती केली. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात दिल्ली महिला आयोगाच्या १८१ क्रमांकावर ३४,४५४ कॉल आले असून, बहुतांश कॉल महिलांच्या समस्येशी निगडित होते. त्यात जेवण तयार करण्याबरोबरच आंतरराज्यीय स्थलांतर याचा समावेश होता. यापैकी बहुतांश समस्यांचा निपटारा केला असून, तक्रारींचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
महिला आयोगाकडे लॉकडाउनसंबंधी २० हजारांहून कॉल आले. त्यात तक्रारकर्त्यांना आयोगाकडून मदत करण्यात आली. ही संख्या २०१९ च्या तुलनेत कमी होती. २०१९ मध्ये मार्च ते जून या कालावधीत घरगुती हिंसचारासंदर्भात ८,१८८ तक्रारी आल्या होत्या, तर २०२० मध्ये याच कालावधीत आयोगाकडे ६,९०९ तक्रारी आल्या. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण कमी होते. त्यानंतर महिला आयोग आणि दिल्ली सरकारने १८१ महिला हेल्पलाइनला प्रोत्साहन दिलेच; त्याचबरोबर महिला आणि तरुणांनी स्वतंत्ररूपाने तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाइनही सुरू केली. लॉकडाउनमुळे संपूर्ण कुटुंबच घरात असल्याने एखाद्या महिलेस आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडता येत नव्हती. परिणामी, लॉकडाउननंतर दिल्ली पूर्वपदावर येत असताना घरगुती हिंसाचार आणि अन्य प्रकरणाच्या तक्रारींतही वाढ झाली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल म्हणाल्या की, लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात तक्रारीत कमालीची घसरण झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तक्रारींचे प्रमाण कमी आहे. मात्र, महिला स्वत:हून तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे आयोग आणि सरकारने जनजागृतीसाठी पावले उचलली. महिला आणि युवतींना स्वतंत्र पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. लॉकडाउनच्या काळातही महिला आयोगाच्या सदस्यांनी चोवीस तास सातही दिवस कोरोनायोद्ध्याप्रमाणे काम केले आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले आहे.

संबंधित बातम्या