अपघातास धावपट्टी, चुकीचे निर्णयही कारणीभूत

PTI
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

कोझिकोड दुर्घटनेवर तज्ज्ञांचे मत; इशाऱ्याकडे दुर्लक्ष

नवी दिल्ली:  कोझिकोड विमानतळावरच्या एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेबाबत तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विमान अपघातास हवेची दिशा, वैमानिकांचा चुकीचा निर्णय, धावपट्टीची स्थिती आणि लँडिंग प्रणाली उपकरणातून मिळालेले चुकीचे संदेश कारणीभूत असू शकतात, असे हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. ओल्या धावपट्टीवर विमान उतरवण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरलेला असताना  वैमानिकाने ते विमान अन्य विमानतळाकडे नेले नाही तर ते अपघाताचे मोठे कारण ठरू शकते, असेही तज्ज्ञांनी नमूद केले. 

गेल्या आठवड्यात दुबईहून १९० जणांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे बोइंग ७३७ विमान कोझिकोड येथील टेबलटॉप रनवे १० वर अपघातग्रस्त झाले. यात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला. 

कॅप्टन मोहन रंगनाथन म्हणाले की, एखाद्या ओलसर धावपट्टीवर वाऱ्यासह उतरणे मुर्खपणा आहे. ही बाब आपण अनेक वर्षांपासून सांगत आहे. कोझिकोडच्या दहाव्या धावपट्टीवर वारे वाहत असताना जर विमान उतरवण्याचा प्रयत्न केल्यास दुर्घटना होऊ शकते, असा इशारा आपण २०११ मध्येच दिला होता, असे रंगनाथन म्हणले. रंगनाथन हे २०११ मध्ये नागरी उड्डयन सुरक्षा सल्लागार समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य होते. अन्य तज्ज्ञांच्या मते, दुर्घटना होण्यामागे पर्यावरण, मानवी निर्णय, विमानाची स्थिती, प्रशासकीय कारण, हवाई नियंत्रण कक्षांकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या सूचना देखील कारणीभूत ठरू शकतात. अपघात होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामुळे एखाद्या निश्‍चित कारणावर तर्क लावू शकत नाही. 

विमान अन्य विमानतळाकडे वळवणे गरजेचे होते
इंडियन एअलाइन्समधील उड्डाण सुरक्षा आणि प्रशिक्षणाचे माजी संचालक कॅप्टन एस.एस. पानेसर म्हणतात, की कोझिकोड येथे खराब वातावरण असल्याने आणि १० व्या क्रमांकाच्या धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेला असताना ते विमान तात्काळ तिरुअनंतपूरम किंवा बंगळूर विमानतळाकडे नेणे गरजेचे होते.

संबंधित बातम्या