Yass Cyclone: येत्या 24 तासात वादळ बंगालला धडकणार!

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

25 मे पर्यंत 'यास' चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतीतीव्र अशा चक्रीवादळात रुपांतरीत होणार आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर (Taukte Cyclone) समुद्र किनारी भागामध्ये 'यास' चक्रीवादळ (Yaas Cyclone) येऊन धडकले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये गुरुवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या 24 तासामध्ये या महाभयंकर वादळाचे रुपांतर तीव्र अशा चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (India Meteorogical Department) वर्तवण्यात आली आहे. 25 मे पर्यंत 'यास' चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतीतीव्र अशा चक्रीवादळात रुपांतरीत होणार आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी 118-165 किमी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढच्या चोवीस तासामध्ये हे चक्रीवादळ बंगलला धडकेल असा अंदाज हावामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील विदर्भ भागामध्ये उष्ण तापमान राहणार असून महाबळेश्वरसह काही थंड हवेच्या ठिकाणी वातावरण जैसे थे असेल असे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत. (Yass Cyclone ​​Storm to hit Bengal in next 24 hours)

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले हे चक्रीवादळ ओडिशा, पश्चिम बंगाल, बांग्लादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याचा वेग वाढला आहे. किनारपट्टीवर ताशी 55 ते 75 किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत या वाऱ्याचा वेग ताशी 110 किमी जाईल. मंगळवारी ताशी 170 किमी  तर बुधवारी ताशी 185 किमी पर्यंत वेगाने वारे वाहतील. या चक्रीवादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन ते तीन दिवस मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये. त्याचबरोबर किनारी भागामध्ये काही दिवस कोणीही राहु नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Yass Cyclone: ओडिशातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सध्या श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाले आहे. यावर्षी किनारपट्टी भागामध्ये निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती वाढली आहे. शिवाय या किनारी भागामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आल्यामुळे  ठिकठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, सागराच्या पाण्याचे तापमान वाढले की, कमी हवेचा दाब तयार होतो. ही परिस्थिती अरबी समुद्रात गेल्या दोन वर्षात वारंवार झालेली दिसून आली आहे. त्यामुळे दरवर्षी चक्रीवादळांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे त्याचाच परिणाम दरवर्षी किनारपट्टीवरील जीवनमानावर होताना दिसून येतो, अशी भिती हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे. दरवर्षी निर्माण  होणाऱ्या वादळाची तिव्रता पाहून आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले.

Monsoon: मान्सून 27 मे ला केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

पूर्व किनारपट्टीसाठी बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणारी वादळे धोकादायक ठरतात. आता पश्चिमेकडील वादळे देखील अधिक धोकादायक ठरु लागली आहेत. ही परिस्थिती कायम राहणार असून अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळांना आता दरवर्षी तोंड द्यावे लागणार आहे. कोकण किनारपट्टीवरील वास्तव्य अधिक धोकादायक असल्याचे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.

साबळे पुढे म्हणाले, पाण्याचे तापमान वाढल्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. सध्या 192 हॅ्प्तास्कल हवेचा दाब आहे. कमी दाबाच्या पट्ट्याबरोबर गोल-गोल वारे तयार होते, यालाच आपण चक्रीवादळ म्हणून संबोधतो. याच पध्दतीने अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती होते. मागील दोन वर्षापासून 'क्यार', 'महा' यासंह अशी अनेक चक्रीवादळे अरबी समुद्रामध्ये निर्माण झाली आहेत. त्यातील काही चक्रीवादळे भुपृष्ठाच्या दिशेने सरकत गेली.
 

संबंधित बातम्या