योग आणि योगा

goa yoga

goa yoga

आपाल्यातील अनेकजण सूर्यनमस्कार घालत असतील, पण योगामध्ये चंद्रनमस्कारही येतात आणि त्याचेही विविध फायदे आहेत. कायाकल्प योग, विन्यास योग, क्रिया योग असे अजून काही प्रकार-उपप्रकार आहेत. येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिवस आहे. हेच औचित्य साधून आपण योगाभ्यासाला सुरवात करूया व आपले तसेच विश्वाचे कल्याण साधूया. 'योग: कर्मसु कौशलम' म्हणजेच सर्व कर्मातील कौशल्य हाच योग आहे हे जाणून जीवन योगमय बनवूया.

योगस्थ: कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय ।  सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ।। २. ४८

'हे अर्जुना, यश आणि अपयशाचा बद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून, समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते.' या श्लोकामधून योगेश्वर श्रीकृष्णाने योगाचा अर्थ व उद्दिष्ट स्पष्ट केले आहे.  भारतातील योग परंपरा फार जुनी आहे. अनादिकालापासून भारतातले ऋषी, योगी हे योग अभ्यास करत आले आहेत. हे ऋषी म्हणजे प्राचीन वैज्ञानिकच. फरक एवढाच की त्यांच्या संशोधनाची दिशा ही बाह्य असून आंतरिक होती.

मनुष्याचे शरीर,मन, बुद्धी या विविध आयामांचा सखोल अभ्यास करून त्यांनी जी तत्त्वं मांडली व स्वतःच्या अनुभवाने अभ्यासपद्धती आखून दिली त्याला योग म्हटलं जातं. स्वतःमधील असीम शक्तीची कवाडं उघडण्यासाठी योग ही किल्ली आहे. स्वतःची खरी ओळख करून घेण्याचा योग हा एक वैज्ञानिक मार्ग आहे. नियमित साधना करणारे योगी हे शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व स्थिर असतात. आपणही योगाभ्यास केला तर हे लाभ आपल्याला मिळू शकतात. सुदृढ लवचीक व बळकट शरीर आणि शांत स्थिर मन हे योगाचे फायदे आहेत व ती काळाची गरज आहे पण आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की योगाचे मुख्य उद्दिष्ट आत्मिक उन्नती आहे.  दुर्दैवाने भारतात रुजलेल्या या योगाबद्दल आपल्याच भारतीयांमध्ये अज्ञान दिसून येतं. सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की आज जगभरात जो योग म्हणून प्रसिद्ध आहे तो 'योग' नसून 'योगा' आहे. आज पाश्चात्त्य देशांमध्ये हा 'योगा' प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. प्राचीन हठयोगातील काही आसने व प्राणायाम यांचा यामध्ये समावेश आहे; काही अंशी नवीन आसनांची भरही पडली आहे.

Gym workout, Zumba, dance workout या व्यायाम पद्धतीप्रमाणे आज 'योगा' हीसुद्धा एक व्यायाम पद्धती म्हणूनच मर्यादित राहिली आहे. अर्थात योगा केल्याचे शारीरिक व मानसिक फायदे नक्कीच आहेत पण चुकीच्या पद्धतीने केल्याने कित्येकांची शारीरिक हानीही झाली आहे. माझ्या मते योगाच्या मुख्य उद्देशाचे विस्मरण झाल्याने योगाच्या चुकीच्या पद्धती तयार झाल्या असाव्यात. एखाद्या वस्तूचे कारण जर आपल्याला माहीत नसेल तर त्याचा बरोबर वापर आपण करू शकत नाही. उदा. चंदनाचा उपयोग जळणासाठी केला जाऊ शकतो पण सुगंध हा चंदनाच्या प्रमुख गुण आहे. उद्देशाचे विस्मरण झाले की विकृती तयार होतात. कठीण कठीण आसने करणे एवढाच जर योग असता तर सर्कसमध्ये कसरती करणाऱ्यांनाही योगी म्हणावं लागलं असतं. योगाचे अंतिम ध्येय आहे समाधी अवस्था होय.

आता याबद्दल अनेक गैरसमजुती आहेत. समाधी अवस्था म्हणजे संन्यास नव्हे. अनेकदा कुणी योगी म्हटलं की आपल्यासमोर दाढी जटा वाढलेल्या, भगवी वस्त्रे घातलेल्या संन्याशाचं चित्र उभं राहतं. पण ही समजूत चुकीची आहे. समाजात राहूनही योग करता येतो. त्याग हा करावाच लागतो पण तो कर्माचा नव्हे तर कर्मफलाचा. फळाची इच्छा न धरता कर्म करीत राहणे यालाच तर कर्मयोग म्हणतात, आणि हे तत्त्वज्ञान सांगणारा श्रीकृष्ण योगीच होता.

महर्षी पतंजली योगाची व्याख्या देता, 'योग: चित्तवृत्ती निरोध:। आपल्या चित्तवृत्तींना नियंत्रित व एकाग्र करणे म्हणजे योग.  पाश्चात्त्य 'योगा' हा प्राचीन योगमार्गाचा एक अंश आहे. आसन व प्राणायाम हा योगामधला महत्त्वाचा भाग आहे. या व्यतिरिक्तही योगाचे अनेक अंग आहेत. आज याचा अभ्यास व त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे आणि हे काम भारतीय युवकांनीच पुढाकार घेऊन केले पाहिजे. याबाबतीत स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.

पाश्चात्त्य जगाला योगाचे महत्त्व पटवून देणारे स्वामी विवेकानंद हे पहिले योगी होते. त्यांचे जीवन आणि विचार युवकांसाठी सतत प्रेरणादायी ठरले आहेत. पण त्यांच्या मोठेपणाचा मूळ हे योगाभ्यास आहे हे निश्चितपणे समजावं. तरुणपणी हा नरेंद्र नास्तिक झाला. तत्कालीन साधू व धर्ममार्तंडांना त्याने प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याला योग मार्गामध्ये मिळाली. मग त्या मार्गाचा अवलंब आम्ही का करत नाही? आपलं अज्ञान झटकून आपण योग जाणून घ्यायला हवा. 

योगामध्ये प्रामुख्याने नाव घेतले जाते ते महर्षी पतंजली यांचे. त्यांना आधुनिक योगाचे जनक म्हटलं जातं. त्यावेळेच्या योगाच्या विविध शाखांचे एकत्रीकरण करून त्यांनी 'योगसूत्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथांमध्ये अष्टांगयोग मांडला आहे. योगाच्या आठ अंगांबद्दल यात भाष्य आहे. ती आठ अंगे म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. या आठ पायऱ्या. यातील यम व नियम ही अंगे आचारासंबंधी आहेत. म्हटलेलेच आहे की 'जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी'. अर्थात कोणतीही गोष्ट करत असताना काही पथ्ये पाळावी लागतात. योगही त्याला अपवाद नाही. ही पथ्ये म्हणजे यम व नियम. यम पाच आहेत- अहिंसा,सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह. तसेच नियमही पाच आहेत- शौच (पवित्रता या अर्थाने) संतोष, तपस्, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान. याप्रमाणे आचार शुद्ध झाले की बाह्यांगापासून अंतरंगाकडे असा प्रवास सुरू होतो, शरीर, श्वास/श्वसन, मन, बुद्धी अशा टप्प्यांनी विविध आसनांद्वारे शरीर बळकट होते, प्राणायामाद्वारे श्वसनक्रिया शुद्ध होते. आता वास्तविक आपण यानंतर ध्यानाकडे वळतो, पण त्या आधी दोन पायऱ्या येतात.

त्या म्हणजे प्रत्याहार व धारणा. प्रत्याहार म्हणजे आपल्या इंद्रियांची आसक्ती दूर करणे व त्या माध्यमाने मन कह्यात आणणे. योगाभ्यास करणारे हे विविध प्रकाराने करतात उदा. उपावास, मौनव्रत. आपल्याला एवढे जरी करायची गरज नसली तरी दरवेळी फोन वाजल्यावर मेसेज पाहिलाच का पाहिजे? स्वास्थ्याला हानिकारक आहे हे माहीत असून सुद्धा बाहेरचे पदार्थ का खाल्ले पाहिजेत? छोट्या छोट्या गोष्टींमधूनही प्रत्याहार साधता येतो. एकदा मन संयमित झाले की ते एकाग्र करता येते. म्हणूनच पुढची पायरी धारणा व ध्यान आहे. आपण इथपर्यंत जरी पोहोचलो तरी जीवनात खूप काही साध्य करता येते. 

अष्टांग योगाबरोबरच भारतात हठयोगाचीही परंपरा आहे. यामध्ये शुद्ध सात्त्विक आहाराबरोबरच शरीरशुद्धीसाठी षट्कर्म क्रिया सांगितली आहे. त्राटक, कपालभाती, नेती, धौती, नौली व बस्ती ही ती षटकर्मे. पाचनसंस्था पूर्णपणे शुद्ध करण्यासाठी 'शंखप्रक्षालन क्रिया' ही फार प्रभावी आहे. हठयोग शारीरिकावर भर देत असल्याने त्यात आसने जास्त आहेत. कुंडलिनी जागरण व सात चक्रांचा योग हाही हठयोगाचा भाग आहे. ओंकार साधनेलाही महत्त्व आहे.  आज आपाल्यातील अनेकजण सूर्यनमस्कार घालत असतील, पण योगामध्ये चंद्रनमस्कारही येतात आणि त्याचेही विविध फायदे आहेत. कायाकल्प योग, विन्यास योग, क्रिया योग असे अजून काही प्रकार-उपप्रकार आहेत. येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिवस येत आहे. हेच औचित्य साधून आपण योगाभ्यासाला सुरवात करूया व आपले तसेच विश्वाचे कल्याण साधूया. 'योग: कर्मसु कौशलम' म्हणजेच सर्व कर्मातील कौशल्य हाच योग आहे हे जाणून जीवन योगमय बनवूया.

- अवधुत वामन मराठे  श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय,  डिचोली - गोवा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com