झेड -मोड’ बोगदा जूनपर्यंत पूर्ण होणार

PTI
बुधवार, 22 जुलै 2020

लडाख-काश्‍मीरचा वर्षभर संपर्क राहणार; साडेसहा किलोमीटर लांब

श्रीनगर

 काश्‍मीर खोऱ्याला लडाखशी जोडणारा बहुप्रतिक्षित सोनमर्ग-गगनगीर मागार्वरील ६.५ किलोमीटर लांबीचा झेड-मोड बोगद्याचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एरव्ही हिवाळ्यात लडाखकडे जाणारा रस्ता बंद होतो, परंतु आता या बोगद्यामुळे कायम स्वरुपात वाहनांची ये-जा सुरू राहणार आहे. सुमारे सहा महिने बर्फ असणाऱ्या भागातून बोगद्याची निर्मिती केली जात आहे.
जम्मू काश्‍मीरचे मुख्य सचिव बी.व्ही. सुब्रह्यण्यम यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. या बैठकीत झेड-मोड बोगद्यासह प्रदेशातील अन्य रस्ते कामाचा आढावा घेतला. यावेळी बोगद्याचे आणि अन्य मोठ्या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. झेड-मोड बोगदा आणि झोझी-ला बोगदा यासह मोठ्या प्रकल्पाची माहिती घेण्यात आली. झेड मोड प्रकल्पात ६.५ किलोमीटरचा बोगदा, सहा किलोमीटरचा रस्ता, दोन मोठे पूल आणि एका लहान पुलाचा समावेश असणार आहे. या योजनेवर २३७९कोटी रुपये खर्च होत हा असून ३० जून २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या बोगद्यामुळे सोनमर्गशी वर्षभर संपर्क राहणार आहे. त्याचवेळी झोझी-ला योजेनवरही काम केले जात आहे.

प्रकल्पाचा खर्च ४४३० कोटी
झेड-मोड आणि झोझी- लाच्या योजनेत एकूण १४.१५ किलोमीटरचा बोगदा, झेड मोड आणि झोझी-ला बोगदा याम्यान १८ किलोमीटरचा एक रस्ता आणि चार मोठे पुल उभारण्यात येत आहेत. या योजनेवर एकूण ४४३० कोटी रुपये खर्च होत असून हे दोन्ही प्रकल्प पूर्णपणे जून २०२६ कार्यान्वित होईल. त्यामुळे लडाखशी वर्षभर संपर्क राहणार आहे. मुख्य सचिवांनी बारामुल्ला-गुलमर्ग, वैलू खानाबल, वैलू -डोनीपावा, डोनीपावा- आशजीपोरा मार्गाच्या कामाचाही आढावा घेतला.
सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा बोगदा
काश्‍मीरला लडाखशी जोडणारा हा ६.५ किलोमीटरचा बोगदा दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना वर्षभर जोडण्यासाठी मदत करणार आहे. कारण हिवाळ्यात सोनमर्गला येणारे पर्यटक पुढे जावू शकत नाही. परंतु हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर श्रीनगर-लेह हा मार्ग सर्व ऋतुत सुरू राहणार आहे. सामारिकदृष्ट्या देखील हा बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे.

झेड-मोड बोगद्याचे वैशिष्ट्ये
बोगद्याचे भूमिपूजन २०१२ मध्ये. २०१५ मध्ये काम सुरू
गगनगीर-सोनमर्ग (६९.५ किलोमीटर) मार्गावरचा बोगदा
रस्ता झेड आकाराप्रमाणे असल्याने बोगद्याला झेड-मोड नाव
लडाख आणि काश्‍मीर खोरे यांचा वर्षभर संपर्क राहणार
६.५ किलोमीटरचा बोगदा, सहा किलोमीटरचा रस्ता, दोन पूल आणि एका लहान पुलाचा समावेश

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या