डिचोलीत फुलू लागले धालोंचे मांड...!

Dainik Gomantak
मंगळवार, 7 जानेवारी 2020

आता हळूहळू गावागावांतील धालोंचे ‘मांड’ फुलू लागणार असून रात्री जागू लागणार आहेत.

तुकाराम सावंत
डिचोली

डिचोली तालुक्‍यात सध्या पारंपरिक लोकसंस्कृती असलेल्या धालोत्सवाचे वातावरण असून सर्वत्र धालोत्सवाची लगबग सुरू आहे. आता हळूहळू गावागावांतील धालोंचे ‘मांड’ फुलू लागणार असून रात्री जागू लागणार आहेत. दरम्यान, मुळगावसह काही भागात धालोत्सवाला सुरवात झाली आहे.
धालोत्सव म्हणजे महिलांचा आनंद व्दिगुणीत करणारा उत्सव. पौष महिन्याच्या आगमन होताच, सर्वत्र गावोगावी सुवासिनींना धालोंचे वेध लागतात. डिचोली तालुक्‍यातील बहूतेक सर्वच भागात तेथील परंपरेनुसार धालोत्सव साजरा करण्यात येतो. काही धालोंच्या 'मांडा' वर पाच तर काही ठिकाणी सात दिवस धालोत्सव चालतो. धालोत्सव काळात धालोंचे मांड महिलांच्या गर्दीने फुलून जातात. धालोगीते, फुगड्या आदी पारंपरिक कार्यक्रमानिशी रात्री जागवल्या जातात. शेवटच्या दिवशी धालोगीते, फुगड्या आदी कार्यक्रमांसह लग्न सोहळा, पिंगळी, ‘सावज’ मारणे आदी पारंपरिक कार्यक्रम पार पाडल्यानंतर ‘मांड’ ठेवून धालोत्सवाची सांगता करण्यात येते. कारापूर, धुमासे आदी काही ठराविक भागात रंभा प्रकार हे तेथील धालोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
दरम्यान, काही भागात धालोंना पारंपरिक पध्दतीने सुरवात झाली आहे. सर्वण येथील सात दिवसीय धालोत्सवाला शनिवारी ११ जानेवारी रोजी प्रारंभ होणार आहे. सर्वणच्या श्री श्‍यामपुरुष आणि श्री कुळमाया मंदिरात मिळून दोनठिकाणी धालोत्सव साजरा करतात.

संबंधित बातम्या