धनगर समाजाचे साधन सुविधा अभावी हाल

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

‘धनगर’चे स्थलांतर नको, साधन सुविधा पुरवा
सरकारांच्या धोरणासंबंधी समाज संघटनेची भूमिका

सदर कुटुंबीयांनी स्थलांतरास विरोध केला असून गेल्या शेकडो वर्षापासून सदर भागात वास्तव्य करून आपल्या उदरनिर्वाहाचे साधन सुविधा निर्माण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या कुटुंबीयांनी आतापर्यंत अनेक प्रकारच्या संघर्षांना समर्पक पद्धतीने तोंड दिले आहे.

पिसुर्ले : सत्तरी तालुक्यातील गोळावली या ठिकाणी चार वाघांच्या मृत्यूनंतर या भागात गेल्या अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करणाऱ्या पावणे कुटुंबीयांचे स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली आहे. परंतु गोळावलीप्रमाणे इतर अभयारण्य क्षेत्रात आदिवासी धनगर समाजाची वस्ती आहे. त्यामुळे त्यांचे स्थलांतर हा उपाय नसून त्या नागरिकांना वनहक्क निवासी कायद्या अंतर्गत सर्व साधन सुविधा देणे गरजेचे आहे.

मात्र या निर्णयाचे गोवा धनगर सेवा संघाचे अध्यक्ष बी. डी मोटे यांनी स्वागत केले. पण एकूण त्यांच्या उदरनिर्वाहाचे व इतर साधन सुविधा संदर्भात काय अशाप्रकारचा सवाल व्यक्त केला आहे.
या संघर्षातून त्यांचे उदरनिर्वाह निर्माण झाले असून सरकारने आम्हाला इतर ठिकाणी स्थलांतर केल्यास शेकडो वर्षापासून सभोवती भागामध्ये निर्माण केलेल्या उदरनिर्वाहाच्या साधनांच्या उत्पादनाबाबत काय अशा प्रकारचा सवाल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोळवली-सत्तरी या ठिकाणी चार वाघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धनगर बांधवाच्या एकूण अस्तित्व व भवितव्य संदर्भात सरकारसमोर संघर्ष निर्माण होऊन सरकारने आता या कुटुंबीयांना ठाणे या ठिकाणी स्थलांतरित करणार असल्याचे विधानसभेत स्पष्ट केले आहे. याबाबत सदर कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या कुटुंबीयाने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. जानेवारी महिन्यामध्ये चार वाघाच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली का अशा प्रकारच्या सवाल या कुटुंबीयांनी केला असून गेले शेकडो वर्षापासून अत्यंत भयानक अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या व आपल्या पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या कुटुंबीयांच्या ज्वलंत समस्या बाबत मात्र कधीही गांभीर्याने लक्ष दिले नाही अशा प्रतिक्रिया या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या आहे.

धनगर कुटुंबीयांना त्रास
चार वाघांच्या मृत्यूनंतर गोळावली-धनगरवाडा या ठिकाणी पावणे कुटुंबीयांना पूर्णपणे टार्गेट करण्यात आले.पावणे कुटुंबातील पाच जणांना अटक करून त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असली तरीही सरकारच्या काही आमदारांकडून धनगर कुटुंबीयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न खरोखरच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया या कुटुंबीयांनी व्यक्त केलेले आहे.ना रस्ता ना वीज अशा अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांच्या समस्याकडे कोणीही लक्ष दिले नाही .आता वाघाच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली आहे का अशा प्रकारचा सवाल या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. वाघांच्या मृत्यूनंतर कारवाईच्या नावाखाली पटापट या कुटुंबीयातील पुरुष मंडळींना उचलणाऱ्या वनखात्याच्या यंत्रणेला या कुटुंबीयांच्या समस्या संदर्भात कधीही का जाग आली नाही अशा प्रकारचा सवाल या कुटुंबीयांनी केला आहे.

पुनर्वसनास विरोधच
अत्यंत अवघड व संघर्ष परिस्थितीमध्ये या कुटुंबीयांनी सदर ठिकाणी दूध उत्पादनाच्या माध्यमातून आपल्या उदरनिर्वाहाची खळगी भरण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करीत असतानाच सभोवताली भागामध्ये काजू लागवड या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ही मंडळी आपला उदरनिर्वाह करीत आहे. आता वाघांच्या मृत्यूनंतर सरकारने या कुटुंबीयांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र या कुटुंबाने त्याला पूर्णपणे विरोध केलेला आहे. सरकार स्थलांतर अंतर्गत ठाणे या ठिकाणी फक्त घर उभारण्यासाठी जागा देऊ शकते मात्र गुराढोरांचे काय अशा प्रकारचा सवाल या कुटुंबीयांनी केला आहे. खासकरून काजू मोसमात पूर्ण वर्षाची बेगमी करणारे उत्पादन प्राप्त होत असते .स्थलांतर केल्यात या काजू उत्पादनापासून या कुटुंबीयांना वंचित राहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे दुधाच्या उत्पादनासाठी पाळण्यात येणारी गुरे यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीरतेने उभा राहणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने संघर्ष ही मंडळी करीत आलेली आहे. अशाच प्रकारच्या संघर्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळातही आम्ही या ठिकाणी वास्तव्य करू अशा प्रकारचा भूमिका या कुटुंबीयांनी घेतल्याचे समजते.

साधन सुविधा हव्या
दरम्यान सत्तरी धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बी. डी मोटे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने उचललेले पाऊल जरी समाधानकारक असले तरी प्रत्यक्षरीत्या त्यांचे स्थलांतर करणे कुटुंबीयाच्या एकूण परिस्थिती संदर्भात शक्य आहे का? अशा प्रकारचा सवाल व्यक्त केला आहे. धनगर समाज हा पूर्णपणे आदिवासी स्वरूपाचा असून आत्तापर्यंत नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून त्यांनी आपले जीवन व्यथित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारने त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्यांवर गांभीर्याने विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. सरकार फक्त कुटुंबा पुरतेच जागा देऊन त्याचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण या धनगर बांधवाची अनेक गुरे आजही त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधार बनला आहे. यामुळे ज्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

सदर ठिकाणी त्यांच्या गुरांसाठी पाणी चारा व्यवस्था सरकार करणार का अशा प्रकारचा सवाल मोटे यांनी व्यक्त केली आहे. त्याच्यापेक्षा सरकारने या कुटुंबीयांसाठी रानटी जनावरापासून सुरक्षितता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घराभोवती भलेमोठे दगडी कुंपण उभारावे. त्यांच्या घरांना संरक्षण प्राप्त करून द्यावे. त्याचप्रमाणे त्यांच्या गाई गुरांसाठी चारा परिसर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने विशेष योजना राबविल्यास या कुटुंबीयांबरोबर सत्तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही अशा संघर्षमय अवस्थेत राहणाऱ्या धनगर समाज बांधवांना महत्त्वाचा आधार मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

 

संबंधित बातम्या