बॅडमिंटनपटू धिती, सौम्याचे संगीतमय `लॉकडाऊन`

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

``जरी लॉकडाऊन आमच्यासाठी कठीण काळ असला, तरी त्याद्वारे आम्हाला आरोग्य आणि स्वच्छता याबाबतच्या जागरुकतेची शिकवण आम्हाला मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांसमवेत महत्त्वपूर्ण वेळ व्यतित करण्याची संधीही लाभली आणि आमचे छंद व आवडीनिवडी यांचा आस्वाद घेणे शक्य झाले.``

- धिती लोटलीकर,

युवा बॅडमिंटनपटू, गायिका

पणजी धिती व सौम्या या लोटलीकर भगिनी गोव्याच्या राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटनपटू आहेत. कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गोड गळ्याच्या या मुलींनी संगीतमय सफर केली, कोरोना विषाणूविरोधी लढ्यास गीतमाध्यमातून बळ दिले. त्यास लोकप्रियताही लाभली आहे.

मडगाव येथील धिती व सौम्या यांचे वडील संतोष लोटलीकर हे लेखक-कवी आहेत. लॉकडाऊन कालावधीत त्यांनी कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणारे गीत लिहिले, त्यास प्रवीण नाईक यांनी संगीतबद्ध केले आणि धिती व सौम्या यांच्या सुरेल आवाजात कर्णमधूर ठरले. नुकतेच हे गीत व्हायरल झाले आहे. हे गीत गोवा बॅडमिंटन संघटनेच्या फेसबुक पेजवर असून सहा तासांत १२,००० जणांनी हे गीत पाहिले, तर ३३६ शेअर्स मिळाले. धिती व सौम्या यांच्यासाठी घरीच तात्पुरता रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार करण्यात आला आणि गाणे ध्वनिमुद्रित झाले.

सुप्रसिद्ध कोंकणी गायिका लॉर्ना यांचे गीत गाऊन दोन वर्षांपूर्वी धिती प्रकाशझोतात आली होती. धिती हिने गायलेल्या लोर्नाच्या गीताचाच सोशल मीडियावर बोलवाला होता. धिती रातोरात स्टार बनली होती. आता लॉकडाऊन कालावधी धितीने आपली धाकटी बहीण सौम्या हिच्या साथीत संगीतमय बनविला आहे. गोड गळ्याच्या बहिणी छानपैकी चित्रंही काढतात. त्यांनी या काळात चित्रकलेचा छंदही जोपासला.

बॅडमिंटनमध्ये धिती व सौम्या यांनी गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. धिती ज्युनियर, तर सौम्या सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत खेळली आहे. शर्मद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मडगावच्या बहुउद्देशीय सभागृहात दोघींचा बॅडमिंटन सराव नियमित असतो, पण लॉकडाऊनमुळे तो रोखला गेला, पण लोटलीकर भगिनी सराव सत्रास विसरल्या नाहीत. घरच्या हॉललाच त्यांनी सराव केंद्र बनविले. संगीताच्या तालावर त्यांचा शारीरिक तंदुरुस्ती सरावही सुरू आहे.

गायन कलेत धिती आणि सौम्या यांना वडील संतोष यांनी प्रोत्साहित केले. सुरवातीस छंद या नात्याने धिती गाऊ लागली, नंतर स्पर्धांत भाग घेऊ लागली, बक्षिसे मिळाली, त्यामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. सौम्याने वयाच्या आठव्या वर्षी गायनास सुरवात केली. सौम्याने विविध गायन स्पर्धांत बक्षिसे मिळविली आहेत. कलांगण येथे आरती नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ती गायनाचे धडे गिरवत आहे. धिती बारावी, तर सौम्या आठव्या इयत्तेत आहे. मडगाव येथील विद्या विकास अकादमी शाळेत दोघीही शिकतात.

``जरी लॉकडाऊन आमच्यासाठी कठीण काळ असला, तरी त्याद्वारे आम्हाला आरोग्य आणि स्वच्छता याबाबतच्या जागरुकतेची शिकवण आम्हाला मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांसमवेत महत्त्वपूर्ण वेळ व्यतित करण्याची संधीही लाभली आणि आमचे छंद व आवडीनिवडी यांचा आस्वाद घेणे शक्य झाले.``

- धिती लोटलीकर,

युवा बॅडमिंटनपटू, गायिका

संबंधित बातम्या