शिक्षण संचालकांचा उद्धटपणा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

शिक्षण संचालकांनी माफी मागावी काँग्रेसची मागणी; पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत. बाजूस अमरनाथ पणजीकर, वरद म्हार्दोळकर, प्रतिमा कुतिन्हो व जनार्दन भंडारी

तसेच शिक्षण संचालकांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज केली.

 

पणजी : राज्यातील उत्तर व मध्यवर्ती विभागातील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला कार्यालयातून ‘चालते व्हा’ असे शब्द उच्चारून अपमानास्पद वागणूक दिली.

या घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत असून शिक्षणमंत्री असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनेची चौकशी करावी. याप्रकरणी आज संध्याकाळी संचालकांविरुद्ध पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पणजीतील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कामत म्हणाले, की प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला मिळणारे वेतन काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १० तारीख उलटली तरी न मिळाल्याने त्यांचा विषय घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथील शिक्षण संचालकांना भेटण्यास गेले होते. त्यांच्याशी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची चर्चा करत असताना शिक्षण संचालकांनी अचानक त्यांना ‘चालते व्हा’ असे सांगून अपमान करण्यात आला. असे शब्द वापरून या शिष्टमंडळाला अपमानित करण्यामागे कोणताही वाद झाला नाही की शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी संचालकांवर प्रश्‍नांचा भडिमार केला नाही.

शांतपणे त्यांच्याकडून वेतन शिक्षकांना न मिळण्यामागचे कारण विचारण्यात आले होते. शिक्षण संचालनालय हे सार्वजनिक कार्यालय आहे व आयएएस अधिकारी असलेल्या या संचालकांकडून अशी वर्तणूक त्यांना शोभत नाही व सार्वजनिक कार्यालयाचा भार सांभाळताना त्यांना असे शब्द वापरता येत नाहीत. ज्या पद्धतीने त्यांनी हे वर्तन करून अपमानित केले त्यासंदर्भात पर्वरी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनहिताच्या दृष्टीने त्यांनी शिष्टमंडळाशी योग्य पद्धतीने वागण्याची गरज होती. मात्र, त्या सार्वजनिक कार्यालयात आहे याचे त्यांना भान न राहता स्वतःच्या घरात असल्याप्रमाणे ‘चालते व्हा’ असा शब्द उच्चारून तमाम गोमंतकीयांना अपमानित केले आहे.

अनेक आयएएस अधिकारी या शिक्षण संचालक पदावर येऊन गेले. मात्र, अशी वागणूक कधी त्यांनी दिली नव्हती. त्यांनी कधी शिक्षक किंवा विद्यार्थ्यांना अपमानित करणारी भाषा वापरली नाही. त्यामुळे विद्यमान संचालकांचा हा उद्धट व अपमान करणारा स्वभाव शिक्षण संचालक पदासाठी शोभणारा नाही. त्यांनी जे काही केले आहे त्याबद्दल माफी मागायला हवी असे विरोधी पक्षनेते कामत म्हणाले. शिक्षण संचालक हा आयएएस अधिकारी असला तरी त्यांनी पदाला शोभेल असे वागायला हवे. जनतेचे प्रश्‍न घेऊन काँग्रेस शिष्टमंडळ गेले होते. त्यामुळे त्यांनी केलेला अपमान हा काँग्रेसचा नव्हे, तर गोमंतकीयांचा आहे असे महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.

 

 

सुर्ला - सावईवेरे पूल लवकरच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

संबंधित बातम्या