जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर?

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुका येत्या १५ मार्चपर्यंत होणार असल्याची माहिती आयोगाने अधिसूचित केली होती. त्यामुळे १२ ते १५ फेब्रुवारीपर्यंत आचारसंहिता व मतदारसंघ आरक्षणाची अधिसूचना काढणे क्रमप्राप्त होते. या निवडणुकीसाठीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

पणजी : गोवा राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक येत्या १५ मार्चला घोषित केली आहे, मात्र, सरकारला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही कामे तसेच अर्थसंकल्पातील योजना लागू करण्याच्या विचारात असल्याने ही निवडणूक आणखी पंधरा दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

मतदारसंघनिहाय मतदार यादी अजून तयार व्हायची बाकी आहे. मतदारसंघातील फेररचनेचे कामही अपूर्ण राहिले आहे. मतदारसंघाच्या आरक्षणाबाबतही अजून काहीच झालेले नाही. सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यातील काही प्रकल्पांची कामे तसेच योजना सुरू करावयाच्या आहेत. पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू झाल्यास सरकारच्या नव्या कामांना तसेच योजना सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकाच पुढे ढकलण्याबाबत सरकारने विचार सुरू केला आहे.

या जिल्हा पंचायत निवडणुका राजकीय पक्ष पातळीवर लढवल्या जाणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष भाजप व काँग्रेस यांच्यासह महराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेही कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी मतदारसंघासाठी या पक्षांची उमेदवार निवडीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अनेक आजी - माजी तसेच नवोदित इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघातून लोकांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. त्यामुळे या निवडणुकीस पक्षाच्या उमेदवारांसह अनेक बंडखोर उमेदवारांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.

 

 

हे वाचा : मुख्‍यमंत्री दहा दिवसांनी भेटले ‘लेकी’ला

संबंधित बातम्या