तुम्हालाही सतत चक्कर येतात का ?

डॉ. श्‍वेता गावस
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

बी.पी.पी.व्ही. (व्हर्टिगो) म्हणजे नेमके काय?

बी.पी.पी. व्ही संबंधित चक्कर येत असल्यास पुढील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. चक्कर आल्यावर तोल जाऊन पडण्याची किंवा जखमी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे जागरूक रहावे. चक्कर येत असल्यास त्वरित जवळच्या ठिकाणी बसून घ्यावे. झोपलेल्या स्थितीतून उठताना सरळ ताबडतोब उठू नये. एका कुशीवर वळून मग हळू उठावे. परत परत चक्कर येण्याची शक्‍यता असल्यास स्थिरतेसाठी आधार घेऊन चालावे.

आरोग्यायण : बी.पी.पी.व्ही. हा व्हेस्टिब्युलर सीस्टमचा एक साधारण आजार आहे; पण, लोकांना याबद्दल खूपच कमी माहिती असल्याचे दिसून येते. बी.पी.पी.व्ही. म्हणजे बिनाईन (सौम्य), पॅरोक्‍सिझमल (अचानक आणि परत परत येणारी), पोजिशनल (हालचाल संबंधित), व्हर्टिगो (चक्कर). देशातील चक्क २० टक्के लोकांना बी.पी.पी.व्ही.ने पछाडलेले आहे. बी.पी.पी.व्ही.चा व्हर्टिगो जास्त करून ५० आणि त्या वरच्या वयोगटातील लोकांमध्ये आढळतो; पण, तो कोणत्याही वयात उद्भवू शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

बहुतांश रुग्णांना बी.पी.पी.व्ही.चे कारण माहीत नसते; पण, पुढीलप्रमाणे गोष्टींमुळे ते होऊ शकते. जसे डोक्‍याला झालेली दुखापत, कानाच्या आतील भागातील दुखणे, संसर्ग किंवा विकृती, वीटामीन 'डी' ची कमतरता, वाढत्या वयासंबंधित बदल इत्यादी.

लक्षणांमध्ये कानात सतत किणकिण आवाज येणे (टिनीटस), कमी दिसणे व कमी ऐकू येणे, उलट्या होणे, मळमळल्यासारखे वाटणे, डोके गरगरणे, डोळ्यांची अनियंत्रित हालचाल (निस्टॅग्मस) व प्रामुख्याने डोके जाग्यावरून हलविल्यावर सतत चक्कर येणे यांचा समावेश होतो. त्यामुळे झोपेत कूस बदलताना किंवा पाठीमागे वळून बघताना, पंखा किंवा गोल फिरणाऱ्या वस्तूंकडे बघताना, संगणक स्क्रीन, टीव्ही बघताना, गाडी/ट्रेनमध्ये उलट बसल्यावर अचानक बी.पी.पी.व्ही.ची चक्कर येऊ शकते. डोळे मिटल्याने हे गरगरणे वाढते.

कानाची भूमिका
आपल्या कानाच्या आत एक वेस्टिब्युलर अपॅरॅट्‌स नावाचा अवयव असतो. त्यात चक्रव्यूहासारखे भाग असतात, म्हणजेच तीन अर्धवर्तुळावर जोडलेल्या रचना असतात. या रचनेत द्वव्य आणि अगदी बारीक केस (सेन्सर) असतात, जे आपल्या डोक्‍याच्या हालचालींवर लक्ष ठेवतात आणि वर-खाली, उजवीकडे-डावीकडे मागे-पुढे अशा हालचालींसोबत गुरुत्वाकर्षणाशी संबंधित डोक्‍याची स्थिती दर्शविण्याचे काम करतात.

त्या रचनेला जोडून असलेल्या ऑटोलिथ अवयवात केल्शियम कार्बोनेटचे छोटे कण (क्रिस्टल्स) असतात; ज्यांना ऑटोकोनिया म्हटले जाते. हे क्रिस्टल्स डोक्‍याच्या हालचालीसोबत किंवा अन्य कारणामुळे कधी कधी आपल्या सामान्य जागेवरून विस्कळीत होऊन अर्धवर्तुळावर रचनेमध्ये जाऊ शकतात. मग विशेषत: आपण जेव्हा झोपतो, किंवा झोपलेल्या स्थितीतून उठण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अडकून राहिल्याने क्रिस्टल्स हालचालीच्या व गुरुत्वाकर्षणाच्या संवेदना मेंदूला पोहोचवण्यास बाधा आणतात व चुकीच्या संवेदना मेंदूपर्यत गेल्याने आपल्याला चक्कर येते.

बी.पी.पी.व्ही.ची लक्षणे आढळल्यास तुम्ही ई.एन.टी. तज्ज्ञ किंवा न्युरोलॉजिस्ट तज्ज्ञाची भेट घेऊ शकता. प्राथमिक तपासणीच्या दरम्यान तज्ज्ञांद्वारे पुढील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला कोणती लक्षणे आणि कधीपासून आहेत? दिवसातून साधारण किती वेळा लक्षणे जाणवतात आणि किती वेळपर्यंत टिकतात? चक्कर येण्यासोबत मळमळ किंवा उलटी येते का? कानातून किणकीण आवाज येत राहतो का? डोळ्यांची अनियंत्रित हालचाल होते का? सतत डोकेदुखी असते का? इतर कोणता वैद्यकीय त्रास किंवा उपचार चालू आहे का?

हालचाली आणि लक्षणांद्वारे निदान ठरवण्यात असमर्थ ठरल्यास तज्ज्ञ ईएनजी (इलेक्‍ट्रोनिस्टेगोग्राफी) किंवा व्हीएनजी (व्हिडीओ - नीस्टॅग्मोग्राफी) या चाचण्या सुचवू शकतात. ज्यामुळे डोळ्यांची असामान्य असलेली हालचाल ओळखण्यात येते. यामध्ये डोक्‍याच्या आणि डोळ्याच्या अनैच्छिक हालचालींचे मोजमाप करून चक्कर कानाच्या रोगामुळे येत आहे की नाही हे निश्‍चित करण्यास मदत होते. पण बी.पी.पी.व्ही. नसून इतर कारणामुळे असलेल्या घेरीचे निदान करण्यासाठी एमआरआय केले जाऊ शकते.

निदान ठरवण्यासाठी डीस्क-हालपीक नावांची शारीरिक चाचणी करतात. या चाचणीतून व्हर्टिगोची तीव्रता, बाजू याबद्दल समजण्यास मदत होते. ही चाचणी व उपचाराची प्रक्रिया न्युरोलॉजिस्ट, ईएनटी तज्ज्ञ किंवा फिजिओथेरपिस्टद्वारा केली जाते. उपचारप्रक्रियेत एपलीज, सेमॉन्ट किंवा कॅनॉलिथ रिपोजिशनिंग नावाच्या प्रक्रिया केल्या जाऊ शकतात. इथे डोक्‍याच्या विशिष्ट हालचाली करून घेतल्या जातात व नियंत्रितपणे कानाच्या आतल्या अर्धवर्तुळाकार भागात अडकलेले क्रिस्टल्स (कण) तिथून वेस्टिब्युलच्या मुक्त क्षेत्रात हलविले जातात.

चक्कर येण्याची लक्षणे किंवा डोळ्यांची अनैच्छिकपणे होत असलेली हालचाल थांबल्यानंतर डोक्‍याच्या हालचालीचे स्थान काही सेकंदांपर्यंत वळवलेल्या स्थितीत ठेवले जाते. दुसऱ्या बाजूला डोके फिरवून परत काही सेकंद ठेवले जाते. कोणत्या बाजूने व कोणती प्रक्रिया द्यायची, हे तज्ज्ञांकडून ठरवले जाते. ८० टक्के रुग्णांमध्ये एक किंवा दोन उपचारानंतर ही प्रक्रिया प्रभावी ठरून आराम मिळतो.

प्रक्रियेनंतर दिवसाच्या उर्वरीत वेळेत डोके/कान खांद्याच्या पातळीपेक्षा वर ठेवण्याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर त्या दिवशी इतर व्यायाम करणे टाळावे. दक्षता न बाळगल्यास सोडवलेले क्रिस्टल्स (कण) परत अर्धवर्तुळाकार विभागात सरकून व्हर्टिगो होऊ शकतो. दुसऱ्या दिवसापासून सलग किमान तीन आठवडे व्हेस्टिब्युलर व गेझ स्टेबिलायझेशन हा डोळ्यांचा व्यायाम चालू ठेवावा.
प्रक्रिया करताना त्रास उद्भवल्यास, चक्कर येणे चालूच असल्यास किंवा मळमळणे, डोके दुखणे यासारखे परिणाम दिसल्यास औषधांची आवश्‍यकता भासू शकते.

बी.पी.पी. व्ही संबंधित चक्कर येत असल्यास पुढील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. चक्कर आल्यावर तोल जाऊन पडण्याची किंवा जखमी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे जागरूक रहावे. चक्कर येत असल्यास त्वरित जवळच्या ठिकाणी बसून घ्यावे. झोपलेल्या स्थितीतून उठताना सरळ ताबडतोब उठू नये. एका कुशीवर वळून मग हळू उठावे. परत परत चक्कर येण्याची शक्‍यता असल्यास स्थिरतेसाठी आधार घेऊन चालावे.

डॉक्‍टरकडून ब्रॅन्ड-डॅरोफ व्यायाम व डोळ्याचे गेझ स्टॅबिलायजेशनचे व्यायाम शिकून रोज करावे.
गेझ स्टॅबिलायझेशनच्या व्यायामात दोन भाग असतात. पहिल्या भागात डोळ्यांसमोर एक वस्तू ठेऊन ती एक एक एक करून चारही बाजूंनी (वर खाली, आजूबाजूला) फिरवली जाते व त्यानुसार डोके स्थिर ठेऊन डोळ्यांच्या हालचाली करत वस्तूच्या दिशेने बघण्यास सांगितले जाते. दुसऱ्या भागात वस्तू आणि डोळ्याची नजर एक जागी स्थिर ठेऊन डोके वरखाली आणि उजवी डावीकडे हलवण्यास सांगितले जाते. हे रोज केल्याने व्हर्टिगोच्या लक्षणांत फरक जाणवतो.

वरील व्यायामासोबत मानेच्या हालचाली करणे, उठून बसणे, पुन्हा झोपणे, पाय जुळवूण डोळे मिटणे, टाचा वर उचलून चालणे व पोट आणि पाठीच्या स्नायूंची शक्ती वाढविण्याचे व्यायाम करावे. सुरवातीला चक्कर वाढल्यासारखी वाटेल; पण, रिपोजिशनिंगची प्रक्रिया व संयम आणि सातत्याने केलेले व्यायाम आणि योग्य काळजी घेतल्यास ही स्थिती व्यवस्थित केली जाऊ शकते.

 

संबंधित बातम्या