पणजी : डॉक्टरांचा हसरा चेहरा आणि ठणठणीत होणार असल्याच्या विश्वासामुळे रुग्ण अर्धा ठणठणीत होतो. डॉक्टर हा वाट चुकलेला समाजसुधारक असतो, या उक्तीसाठी गोवा योग्य उदाहरण ठरू शकते.
अत्यंत सकारात्मक बाब म्हणजे गोव्यात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. गोवा मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत केवळ चार प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे प्रमाण देशातील इतर राज्यात होणाऱ्या हल्ल्यांच्या तुलनेत अत्यल्प आहे.
राज्यातील रुग्ण अतिशय नम्र आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता बाळगणारा नाही. राज्यात ज्येष्ठ डॉक्टर आहेत, ज्यांच्याकडे वर्षानुवर्षे रुग्ण येत असल्याने त्यांच्यामध्ये कौटुंबिक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णांकरवी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत चर्चा आणि जनजागृती अभियाने राबविण्यात येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर गोव्यात असणारी स्थिती समाधानकारक आहे.
आपुलकीचा जिव्हाळा : कांचन
या संदर्भात बोलताना उत्तर प्रदेशातून गोव्यामध्ये फिरण्यास आलेल्या आणि लहान अपघात झाल्याने सध्या गोमेकॉत उपचार घेणाऱ्या कांचन म्हणतात, गोव्यात डॉक्टरांच्या रुपात खऱ्या अर्थाने देव भेटतो. मदतीसाठी १०८ रुग्णवाहिका जशी अर्ध्या तासाच्या आत धावून आली, तशाच प्रकारे येथील डॉक्टरांनीही आम्ही बाहेरचे असून आम्हाला योग्य मदत केली. आम्ही गडबडीत त्यांच्याकडे घरी जाण्याची परवानगी मागत होतो. मात्र, त्यांनी आमच्या काळजीपोटी ती परवागी दिली नाही आणि उपचार पूर्ण झाल्यावरच परवानगी दिली. असा आपलेपणा इतर कोठेही अनुभवण्यास मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे शिक्षण संचालनात ठिय्या आंदोलन
लोकसंवादामुळे मैत्रीपूर्ण नाते
गोव्यातील डॉक्टरांचा संबंध लोकांसोबत केवळ उपचारादरम्यान येत नाही. ‘आयएमए’च्या माध्यमातून राज्यातील सर्व डॉक्टर लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचतात. त्यामुळे त्यांच्यात आणि लोकांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते. राज्यात मधुमेह, कर्करोग, स्थूलपणासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर तोडगा कसा काढायचा, यासह या समस्या लोकांच्या आयुष्यात येऊ नयेत, म्हणून डॉक्टर शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन लोकांकडे संवाद साधतात. त्यामुळे असे नाते निर्माण होण्यास मदत होते. शिवाय लोकांचा डॉक्टरांवरील विश्वासही वाढत असल्याचे डॉ. अर्वाटिगी म्हणाले.