जीवनातील समस्यांकडे आव्हान म्हणून पहा : डॉ. पटेल

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

व्याख्यान देताना डॉ. गिरीश पटेल.

व्याख्यानाला उपस्थित जनसमुदाय.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालयातर्फे कांपाल-पणजी येथे दयानंद बांदोडकर मैदानावर शिवरात्री महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या अध्यात्मिक प्रबोधनात्मक व्याख्यानमालेत ‘नैराश्‍य त्यावर उपाय व काळजी’ या विषयावर बोलत होते.

पणजी ः जीवनात आवश्‍यक गोष्टींचा विचार करून अनावश्‍यक गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर समस्या निर्माण होणार नाहीत. जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या या आपण नकारात्मकतेकडे वळल्याने निर्माण होतात. समस्यांपासून धास्ती बाळगून पळू नका, निराश होऊ नका तर समस्यांकडे आव्हान म्हणून पहा. त्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल, आत्मिक शक्ती वाढेल. सकारात्मक दृष्टीकोनामुळे समस्यांवर मात करता येते, याची जाणीव आंतरराष्ट्रीय ट्रेनर सायकोथेरपिस्ट डॉ. गिरीश पटेल (रा. मुंबई) यांनी दिली.

ते म्हणाले, आजच्या परिस्थितीत मन एवढं जटील झालं आहे की, ते नकारात्मकतेकडे वळते. मग त्यातून समस्या पदरी पडतात. समस्यांची कारणे आपण बाहेर शोधतो आणि आतील खऱ्या कारणांकडे लक्ष देत नाही. मग नैराश्‍य येते. आपल्या अंतर्मनात काय चालले आहे याच्याकडे लक्ष द्यायला हवे.

आपलं जे काही हरवले आहे, ते आतलेच आहे आणि आपण बाहेर शोधण्यात शक्ती खर्च करतो हे सोदाहरण स्पष्ट करून डॉ. पटेल यांनी सांगितले की, अहंकार आपल्याला नाशाकडे नेतो. नैराश्‍य दूर करण्यासाठी स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याची नितांत गरज आहे आणि परिवर्तनासाठी अध्यात्म कामी येते. अध्यात्म हा धर्म नव्हे, तर ते विज्ञान आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी ‘मॅजिक ऑफ मेडिटेशन’ या विषयासंदर्भात त्यांनी सकाळी ध्यानधारणा कृतिसत्र घेतले. संध्याकाळी त्या विषयी मार्गदर्शन केले.

‘ध्यानधारणा’ ही अंतर्मनाची यात्रा
डॉ. पटेल म्हणाले, ध्यानधारण ही अंतर्मनाची यात्रा आहे. त्याद्वारे शरीर स्वास्थ राखण्यास मदत होते. भावनिकदृष्ट्या आपण निरोगी असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही देव, धर्म मानता. परंतु ही शक्ती प्राप्त करण्याची माध्यमे आहेत, याचा विचार केला पाहिजे. भूतकाळ, भविष्यकाळापेक्षा वर्तमानकाळ हे ‘सत्य’ आहे. त्याचा आनंद कसा घेता येईल हे पाहिले पाहिजे.

मराठी साहित्य संमेलन

भावनेमध्ये जबरदस्त ताकद...
योगाचा अर्थ जोडणे आहे आणि वियोग म्हणजे अलग होणे असे सांगून डॉ. पटेल म्हणाले, ध्यानधारणेमुळे स्वतःवरील विश्‍वास वाढतो. संस्कार मनुष्याच्या सोबत चालतात. म्हणून संस्कार महत्त्वाचे असतात हे डॉ. पटेल यांनी पटवून दिले. भावनेमध्ये जबरदस्त ताकद असते आणि ध्यानधारणा ही भावनेशी निगडीत असते, असे ते म्हणाले.
 

संबंधित बातम्या