क्रीडापटू डॉ. कुडचडकरांचा खळाळता उत्साह

किशोर पेटकर
गुरुवार, 23 एप्रिल 2020

क्रीडापटू डॉ. कुडचडकरांचा खळाळता उत्साह

पणजी,

कुडचडे येथील डॉ. सतीश कुडचडकर यांचे वय आहे ७५, पण त्यांचा जोश तरुणास लाजविणारा आहे. कोरोना विषाणूमुळे जगाचा वेग मंदावला आहे, समाज बंदिस्त आहे, पण क्रीडाप्रेमी डॉक्टरांच्या उत्साहासमोर लॉकडाऊननेही हार मानली.
डॉ. सतीश कुडचडकर सध्या कुडचडे येथे वैद्यकीय व्यवसायात सक्रिय आहेत. ते दर्जेदार बॅडमिंटनपटू असून राष्ट्रीय व्हेटरन्स बॅडमिंटनमधील ७०+ गटातील मानांकनात ते क्रमांक दोनचे खेळाडू आहेत. गतमोसमात त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील व्हेटरन्स गटात रौप्यपदके जिंकली होती. कुडचडे येथील स्वतःच्या सुश्रुषालय इस्पितळात कार्यरत राहणारे डॉ. कुडचडकर सकाळच्या सत्रात कुडचडे क्रीडा संकुलात तरुण बॅडमिंटनपटूंसमवेत खेळताना दिसतात, पण लॉकडाऊनमुळे त्यांचे नियमित बॅडमिंटन सराव सत्र खंडित झाले आहे. त्यांची तंदुरुस्ती थक्क करणारी आहे. दररोज पहाटे लवकर उठून व्यायाम करणे, बॅडमिंटन खेळणे त्यांचा नित्यक्रम, मात्र लॉकडाऊनमध्येही त्यांनी त्यात खंड पडू दिलेला नाही.
डॉक्टर कुडचडकर यांनी सांगितले, की ``सध्या स्टेडियममध्ये बॅडमिंटन खेळणे शक्य नाही, त्यामुळे घरच्या हॉललाच तात्पुरते बॅडमिंटन कोर्ट बनविले आहे. वॉल प्रॅक्टिसवर भर देत बॅडमिंटनचा सराव कायम राखला आहे. हे सत्र दर दिवशी पाऊण तास ते तासभर चालते. याशिवाय इतर व्यायाम, सायकलिंग इत्यादी मी घरीच करतो. दररोज माझे घर मीच स्वच्छ करतो. झाडू मारणे माझ्यासाठी नित्याचेच आहे. याशिवाय बागायतीत झाडांना पाणी देण्याचा छंद माझ्यासाठी आनंददायी ठरतो.``

बासरी वादनाची संधी...
वैद्यकीय क्षेत्रातील कार्य, बॅडमिंटन व क्रिकेट खेळातील यश याव्यतिरिक्त डॉ. सतीश कुडचडकर यांना संगीतातही रुची आहे. शाळेत असताना वडिलांकडून बासरी वादन शिकल्याचे त्यांनी सांगितले. पंडित हरिप्रसाद चौरासिया हे त्यांचे आवडते बासरीवादक आहेत. ``वैद्यकीय व्यवसायात मग्न राहिल्यामुळे माझे बासरी वादन बाजूस राहिले होते. आता लॉकडाऊनमध्ये दररोज बासरी वादनाचा रियाज करण्याची संधी प्राप्त झाली आहे. दररोज पहाटे ४.३० ते ५.३० या कालावधीत बासरी वादनाचा रियाज करून नंतर व्यायाम व बॅडमिंटनचा सराव करतो. गेली काही वर्षे बासरी खुंटीला टांगून ठेवली होती, आता लॉकडाऊनमध्ये ती बाहेर काढता आली. माझे बासरी वादनातील कौशल्य पाहून मित्रमंडळींबरोबर पत्नीही थक्क झाली आहे, `` असे डॉ. कुडचडकर यांनी डोळे मिचकावत सांगितले.

उत्कृष्ट क्रिकेटपटूही....
डॉ. सतीश कुडचडकर हे बॅडमिंटन खेळाव्यतिरिक्त क्रिकेटमध्येही उत्कृष्ट खेळाडू होते. मैदानी खेळातही त्यांनी चमक दाखविलेली आहे. पणजी जिमखान्याकडून ते अ विभागीय क्रिकेट स्पर्धा खेळले आहेत. आपल्या क्रिकेटविषयक आठवणींत रमताना डॉ. कुडचडकर यांनी सांगितले, की ``मी अष्टपैलू होतो. फलंदाजीत छाप पाडत होतो, काही शतकेही झळकावली आहे. त्या काळातील मी एक चांगला वेगवान गोलंदाज होतो. आऊट स्विंगसाठी मला ओळखले जायचे. त्याकाळी गोवा रणजी करंडक क्रिकेटमध्ये नव्हता, पण अन्य स्पर्धांत मी गोव्याचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. इतर राज्यातील संघासोबत आमच्या मैत्रीपूर्ण स्पर्धा होत असत.``

 

संबंधित बातम्या