कोरगावमध्ये ५१ लाखांचे अमली पदार्थ सापडले

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जानेवारी 2020

पेडणे पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायं. ७.३० वा.च्‍या सुमारास एका घरावर छापा मारून धडक कारवाई केली. याप्रकरणी इफेचुक्वू डेव्‍हिड मडुक्वे (वय ३०) या नायजेरियन नागरिकास अटक केली आहे.

प्रकाश तळवणेकर
पेडणे

मडगावात ड्रग्‍जविरोधी कारवाई झाल्‍यानंतर कोरगाव - पेडणे येथे सुमारे ५० लाख ९० हजार रुपयांचा अमलीपदार्थ जप्‍त करण्‍यात आला. पेडणे पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायं. ७.३० वा.च्‍या सुमारास एका घरावर छापा मारून धडक कारवाई केली. याप्रकरणी इफेचुक्वू डेव्‍हिड मडुक्वे (वय ३०) या नायजेरियन नागरिकास अटक केली आहे. त्याच्या खोलीत सापडलेल्या अमली पदार्थामध्ये ३०९ ग्रॅम कोकेन व २०० ग्रॅम एमडीएमए या अमली पदार्थांचा समावेश आहे.

पक्की खबर मिळाली आणि...
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरगावमधील मानशीवाडा या भागात हा संशयित घर क्रमांक २४३ मध्ये भाड्याने खोली घेऊन रहात होता. हे घर सहज दिसता येणार नाही, अशा ठिकाणी आहे. या घरात राहणारी व्यक्ती अमली पदार्थाच्या व्यवसायात असल्याची माहिती पेडणे पोलिसांना मिळाली होती. गेले काही दिवस पेडणे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. जुन्या वर्षाला निरोप देणाऱ्या कार्यक्रमासाठी आयोजित पार्टीसाठी त्याने अमली पदार्थ आणून ठेवल्याची पक्की माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या घरावर छापा टाकला व अमली पदार्थ जप्त करून संशयिताला अटक केली. त्यात कोकेनची किंमत ३० लाख ९० हजार रुपये, तर एमडीएमएची किंमत २० हजार रुपये व अन्‍य अमली पदार्थ मिळून एकूण ५० लाख ९० हजार रुपयांचा अमलीपदार्थ सापडला.
पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदेश चोडणकर उपनिरीक्षक संजीत कानोळकर, विवेक कानोळकर, कॉन्‍स्टेबल अनंत भाईडकर, रुपेश कोरगावकर, विनोद शर्मा, विष्णू गाड, गुरुदास मांद्रेकर यांनी ही कारवाई उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पेडणे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या