आर्थिक जनगणना जागृती

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

आर्थिक जनगणना कार्यक्रमाला सहकार्य करा.
प्रकल्प अधिकारी विनीत कुंडईकर यांचे आवाहन

मामलेदार कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्थिक जनगणना कार्यक्रमाचे अधिकारी विनीत कुंडईकर, मामलेदार विमोद दलाल व आर्थिक जनगणना करण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी.

आगोंद : आकडेवारी आणि प्रोग्राम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे सातव्‍या आर्थिक जनगणना कार्यक्रमाला काणकोणात सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांनी सर्वेक्षण करण्याकरता घर व आस्थापनाला भेट देऊन सरकारी माहिती गोळा करणाऱ्या विद्यार्थी व निरीक्षकांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन या प्रकल्पाचे अधिकारी विनीत कुंडईकर यांनी केले आहे.

काणकोण मामलेदार कार्यालयात १८ रोजी, ‘आर्थिक जनगणना जागृती’ करण्याकरता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कुंडईकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासह काणकोण मामलेदार विमोद दलाल व कुंडईकर यांचे सहकारी उपस्थित होते.

भौगोलिक प्रसारमाध्यमे अंतर्दृष्टी अंतर्गत आर्थिक जनगणनेला एकदम उपयुक्त अशी माहिती गोळा करण्याकरता पूर्वी प्राथमिक शिक्षकांची मदत घेतली जायची. मात्र, यावेळी सर्व माहिती एका ॲपवर गोळा केली जाणार आहे. या विषयीचे प्राथमिक जनगणना सर्वेक्षण खोतीगाव पंचायतीतील एकूण सात घरांत १४ फेब्रुवारी रोजी झाले. यावेळी या कार्यक्रमाचे अधिकारी, एनुमेरेटर व प्रशिक्षित विद्यार्थी आदींनी भाग घेऊन काम व्यवस्‍थित होत असल्याबद्दल खात्री करून घेतली होती, असे कुंडईकर म्हणाले.

यंदा श्री मल्लिकार्जुन व चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या एकूण ३७ विद्यार्थ्यांना या विषयीचे विविध पातळीवर प्रशिक्षण दिलेले असून हे सर्वेक्षण ३१ मार्चपर्यंत एनुमेरेटर मोबाईल डेटा गोळा करणार, ज्या ठिकाणी रेंज मिळणे कठीण आहे अशा ठिकाणी ऑफलाईन मोडमध्ये हे काम होऊ शकते. काणकोणातील हे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण केले जाणार आहे, असे श्री कुंडईकर म्हणाले.

आर्थिक जनगणनेला अशा सर्वेक्षणाची गरज वेळोवेळी भासत असून यापूर्वी असे सर्वेक्षण २०१३ साली संपन्न झाले होते. केंद्र सरकारला विविध योजना राबविण्याकरता याचा खूप उपयोग होत असतो.
नागरिकांना सोयीचे व्हावे याकरता महाविद्यालयीन विद्यार्थी आप-आपल्या नेमून दिलेल्या ठिकाणी संध्याकाळच्यावेळी भेट देऊन काही प्रश्‍‍न विचारून माहिती गोळा करणार आहेत. या विद्यार्थ्यांकडे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस निरीक्षक आदींकडून दिलेले प्रमाणपत्र असेल. त्यामुळे कोणी गोंधळून जाण्याची गरज नाही. ही माहिती गुप्त राहील याची खात्री बाळगावी, असे कुंडईकर शेवटी म्हणाले.
 

 

 

गोव्यातील लाकूड तस्करी प्रकरण

 

संबंधित बातम्या