ईडीसी पाटो प्लाझाचा दुसरा टप्पा राबवणार

Dainik Gomantak
रविवार, 12 जानेवारी 2020

ईडीसीला राज्यात इतर ठिकाणीही पाटो प्लाझाच्या धर्तीवर सुविधा विकसित करायच्या आहेत. पाटो प्लाझा येथे १ लाख ७७ हजार चौरस मीटर जागेत पाटो प्लाझाची उभारणी केली आहे.

अवित बगळे
पणजी

, ता. ११ ः पणजीतील पाटो प्लाझा व्यवसाय संकुलाच्या यशस्वी उभारणीनंतर गोवा आर्थिक विकास महामंडळ राज्यभरात पाच ठिकाणी असे प्लाझा उभारणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे, अशी विनंती महामंडळाकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे. अशी संकुले उभारण्यासाठीचा प्रस्ताव सरकारने मंजूर करावा अशी मागणीही ईडीसीने सरकारकडे केली आहे.
ईडीसीच्या ३६९ व्या बैठकीत याविषयीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ईडीसीला राज्यात इतर ठिकाणीही पाटो प्लाझाच्या धर्तीवर सुविधा विकसित करायच्या आहेत. पाटो प्लाझा येथे १ लाख ७७ हजार चौरस मीटर जागेत पाटो प्लाझाची उभारणी केली आहे. तेथील विकसित भूखंड त्यांनी राज्य व केंद्र सरकारची विविध खाती व उद्योग समूहांना दिले. त्यांतून त्यांनी तेथे सुविधा विकसित केल्या, इमारती उभारल्या. त्या इमारतींभोवती पे पार्किंग असून त्यातून ईडीसीला नियमित महसूल मिळण्याची व्यवस्था झाली आहे. प्रशस्त रस्ते, पदपथ, चांगल्या जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, सात उपकेंद्रांसह सुरळीत वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला पाटो प्लाझा परिसरात आपले कार्यालय असावे असे वाटते.
पाटो प्लाझा येथे भूखंड वा इमारतीत जागा हवी अशी वाढती मागणी पाहता पाटो प्लाझाच्या विस्ताराची योजना आखणे ईडीसीला गरजेचे वाटू लागले आहे. त्यातूनच चिंबल चौकाच्या दोन्ही बाजूला भू संपादन करून पाटो प्लाझाचा दुसरा टप्पा राबवावा असा विचार ईडीसीने चालवला. सरकारनेही ईडीसीसाठी खास भू संपादन अधिकारी आता नियुक्त केला आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून हे भूसंपादन करावे अशी मागणी ईडीसीने सरकारकडे केली आहे.
गोवा आर्थिक विकास महामंडळ उसगाव, पीर्ण, वेर्णा, धारगळ आणि चिंबल चौक परिसरात पाटो प्लाझाच्या धर्तीवर सुविधा व भूखंड विकसित करणार आहे. सध्या ईडीसीने तसा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. सरकारने भू संपादन करून जमीन उपलब्ध करून दिली की त्यापुढील वर्षभरात या सुविधा विकसित करण्याचे ईडीसीने ठरवले आहे. ईडीसीच्या संचालक मंडळाने याची कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.

शैक्षणिक हब
गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शैक्षणिक व आरोग्यविषयक हब विकसित केले जाणार आहेत. त्याशिवाय व्यावसायिक कारणांसाठी भूखंड विकसित करण्याची योजना आहे. त्या परिसरात सर्व पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या देण्यात येणार आहेत. पाटो प्लाझाचा विकास झाला तसाच या भागांचा विकास करण्याची योजना आहे.

संबंधित बातम्या