नव्या वर्षात विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे

Dainik Gomantak
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

नव्या वर्षात युवा वर्गाच्या मानसिकतेत आमुलाग्र बदल करण्याचे स्वप्नही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहिले आहे.

अवित बगळे
पणजी

गोव्याच्या विकासात युवा पिढीचा हातभार हवा, असे दूरगामी लक्ष्य ठेवत विद्यार्थ्यांत उद्योजकतेची बिजे नव्या वर्षात रुजवली जाणार आहे. गोवा आर्थिक विकास महामंडळ (ईडीसी) आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांतून येणारी पिढींतून उद्योजक निर्माण व्हावेत, असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जाणार आहेत. नव्या वर्षात युवा वर्गाच्या मानसिकतेत आमुलाग्र बदल करण्याचे स्वप्नही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहिले आहे.
ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत व्यवसायासाठी मदत मिळू शकते आणि या योजनेतून मदत मिळवण्यासाठी रोजगार विनिमय कार्ड रद्द करावे लागत नाही, याची माहिती अनेकांना नव्हती. त्यामुळे उत्तर व दक्षिण गोव्यात दोन मेळावे घेऊन याची माहिती दिली. आता युवक युवतींकडून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. आठवी उत्तीर्ण अशी अट या योजनेच्या लाभासाठी आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनावर उद्योजकता हा विषय बिंबवला तर शिक्षण पूर्ण झाल्यावर तो किंवा ती नोकरीसाठी वणवण वा प्रयत्न करणार नाही. आपण स्वयंरोजगार साधू शकतो. आपण इतरांच्या हातांना काम देऊ शकतो वा आपणच आपला साहेब होऊ शकतो, हे विद्यार्थी दशेतच बिंबवले गेले पहिजे. यासाठी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची ईडीसीने मदत घेतली आहे. सुरवातीच्या टप्प्यात उच्च माध्यमिक शिक्षकांचा मेळावा घेतला. त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी कुठे कुठे आहेत व भविष्यात असू शकतात, याची माहिती दिली. व्यावसायिक शिक्षकांकडून त्या क्षेत्रांच्या विकासासाठी काय केले पाहिजे, हे जाणून घेतले आहे.

शिक्षकांनाही देणार प्रशिक्षण
यापुढील टप्प्यात माध्यमिक पातळीवर शिक्षकांना हा विषय समजावून सांगितला जाणार आहे. त्यासाठी मंडळाच्या सहकार्याने शिबीर घेतले जाईल असे सांगून ते म्हणाले, राज्याचा विकास करण्यासाठी सर्व क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे. गोमंतकीय तरुण तरुणी या क्षेत्राच्या विकास करण्यासाठी उतरतील तेव्हा राज्याची घोडदौड कोणी रोखू शकणार नाही. ईडीसीने आपल्या मुख्यालयात इन्क्युबेशन सेंटरची क्षमता ७८ वरून शंभर केली आहे. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना कार्यालय स्थापन करण्याचा खर्चही करावा लागू नये, यासाठी या केंद्रात मुलभूत आवश्यक त्या सर्व सुविधा माफक दरात दिल्या जातात.

आत्‍मविश्‍‍वास वाढविणार
हे सर्व करण्यामागे भावी युवा पिढीची मानसिकता बदलण्याचा खटाटोप असल्याचे सांगून ते म्हणाले, शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी हे संकल्पना त्यांना मनाला शिवता कामा नये. आपण काही उद्योग करू शकतो. त्यावर आपली व इतरांची उपजिविका चालवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे हे स्वप्न आहे आणि येत्या नववर्षात ते प्रत्यक्षात आणले जाईल.

उद्योजकता विकास हा शिक्षण संपल्यावर करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी दशेतच उद्योजकता विकासासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यकतेनुसार माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करावा, असा सरकारकडे आग्रह केला जाईल.
- सदानंद शेट तानावडे, अध्यक्ष ईडीसी

 

संबंधित बातम्या