अर्ज माघारीनंतरही अनेक मतदारसंघात बंडखोरी कायम

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

पणजीः जिल्हा पंचायत निवडणुकीत आज अर्ज माघारीनंतर अनेक मतदारसंघात अद्याप बंडखोरी कायम असल्याचे दिसते. सत्ताधारी भाजपलाच या बंडखोरीचा सामना अनेक ठिकाणी करावा लागणार आहे. कॉंग्रेसला काही ठिकाणी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

पणजीः जिल्हा पंचायत निवडणुकीत आज अर्ज माघारीनंतर अनेक मतदारसंघात अद्याप बंडखोरी कायम असल्याचे दिसते. सत्ताधारी भाजपलाच या बंडखोरीचा सामना अनेक ठिकाणी करावा लागणार आहे. कॉंग्रेसला काही ठिकाणी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

पेडणे तालुक्यातील मोरजी मतदारसंघातून सतीश शेटगावकर हे अपक्ष आहेत. त्यांची उमेदवारी ही कॉंग्रेसच्या मतांवर प्रभाव टाकणारी ठरू शकते. तोरसे मतदारसंघातून पूर्वीच्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या आणि सध्या भाजपमध्ये असूनही उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढणाऱ्या भारती सावळ या भाजपची मते आपल्याकडे खेचू शकतात. हरमल मतदारसंघातून पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांचे खंदे समर्थक रंगनाथ कलशावकर अपक्ष लढत आहेत. तेथेही भाजपच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा कॉंग्रेसला होऊ शकतो.

बार्देश तालुक्यात माजी आमदार किरण कांदोळकर यांची नाराजी भाजप कशी हाताळते यावर थिवी व कोलवाळ मतदारसंघातील राजकीय गणित बऱ्यापैकी अवलंबून आहे. कोलवाळ मतदारसंघातून कांदोळकर यांच्या पत्नी कविता या अपक्ष म्हणून लढत आहेत. सिरसई मतदारसंघात कांदोळकर समर्थक आनंद तेमकर रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघात अपक्षांच्या मागे आपली शक्ती उभी करण्यात कांदोळकर यांना किती यश येते यावरच भाजपची मताची टक्केवारी तेथे घटणार आहे. थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर तेथील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

खोल मतदारसंघात सात उमेदवार असले तरी तेथे कोणत्याही पक्षात बंडखोरी झालेली नाही. पैंगीण मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये सरळ लढत आहे. बार्सेतही पाच उमेदवार असून तेथेही बंडखोरी नाही.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य भावेश जांबावलीकर यांनी अपेक्षेप्रमाणे आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या या माघारीनंतर समाज माध्यमांवर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. रिवण मतदारसंघातून भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांचे बौद्धीक घेतल्यानंतर पक्ष हा महत्वाचा असतो असा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातून अपक्ष लढणारे ज्योसिन डिकॉस्ता हे कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याने ते कॉंग्रेसची मते आपल्याकडे खेचतील. दुसरे अपक्ष गजानंद रायकर हे आमदार प्रसाद गावकर यांचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यामागे आमदारांचे पाठबळ असेल. त्यामुळे या मतदारसंघात पक्षीय उमेदवारांपुढे हे अपक्ष आव्हान उभे करणार असे दिसते.

फोंड्यातील बोरी मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्या पूनम सामंत या अपक्ष म्हणून लढत आहेत. त्या भाजपचे उमेदवार दीपक बोरकर यांच्यासमोर कटकटी निर्माण करू शकतात. या मतदारसंघात कॉंग्रेसने उमेदवार उभा केला नसून मगोचे उमेदवार बाबूराव सालेलकर यांना कॉंग्रेसचा सक्रीय पाठींबा मिळू शकतो. डिचोलीतील लाटंबार्से मतदारसंघात संजय शेटये हा भाजपचे समर्थक मानले जातात. त्यांच्या पाठींब्याने प्रदीप रेवोडकर हे अपक्ष लढत आहेत. ते मुळगावचे माजी सरपंच व विद्यमान पंच आहेत. भाजपने या मतदारसंघात श्रृती घाटवळ यांना दिलेली उमेदवारी भाजपच्या एका गटाला मान्य नाही ते सारे रेवोडकर यांना समर्थन देतील असे आजचे चित्र आहे. मये मतदारसंघात माजी सभापती अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट रिंगणात आहेत. त्यामुळे त्याही मतदारसंघात भाजपची मते फुटतील असे दिसते.
 

संबंधित बातम्या