उद्योग जगतासंदर्भात प्रत्येकाने अद्ययावत असावे

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

उद्योग जगतासंदर्भातील अधिकाधिक माहिती मिळवून प्रत्येकाने अद्ययावत राहायला हवे. तेव्हाच या क्षेत्रात आपल्याला पुढे पुढे जास्तीत जास्त समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन जिनो फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप साळगावकर यांनी केले.

म्हापसा: उद्योग जगतासंदर्भातील अधिकाधिक माहिती मिळवून प्रत्येकाने अद्ययावत राहायला हवे. तेव्हाच या क्षेत्रात आपल्याला पुढे पुढे जास्तीत जास्त समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन जिनो फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप साळगावकर यांनी केले. पेडे म्हापसा येथे इंडोअर स्टेडिअममध्ये रोटरॅक्‍ट क्‍लब ऑफ म्हापसाने आयोजित केलेल्या उद्यमशीलता परिषदेचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

रविवार ९ रोजी दुपारी २.१५ वाजता या परिषदेचा समारोप सोहळा होणार आहे. रोटरी क्‍लब ऑफ म्हापसा आणि खोर्ली म्हापसा येथील श्रीधर काकुलो महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेचे दै. "गोमन्तक' माध्यम प्रायोजक आहे.

या प्रसंगी क्‍लबचे अध्यक्ष जनार्दन हळदणकर, सचिव श्रेयश बांदोडकर, सारस्वत शिक्षण संस्थेचे सचिव रूपेश कामत, म्हापसा रोटरी कल्बचे अध्यक्ष अमोल बर्वे व परिषदेचे अध्यक्ष सार्थक शिरोडकर व्यासपीठावर उपस्थित होते.

दिलीप साळगावकर पुढे म्हणाले, उद्योगव्यवसायासंदर्भात अशा स्वरूपाच्या परिषदा आयोजित करणे खरोखरच आव्हानात्मक असते. उद्यमशीलता विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला पूरक माहिती मिळाली तरच आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनी या परिषदेत होणाऱ्या वार्तालापांत सहभागी होऊन शंकानिरसन करून घेतले तरच परिषदेची ती फलश्रुती ठरेल.

स्वागतपर भाषणात जनार्दन हळदणकर म्हणाले, रोटरॅक्‍ट क्‍लब ऑफ म्हापसा गेल्या तेवीस वर्षांपासून कार्यरत असून, आम्ही ही उद्यमशीलता परिषद पहिल्यांदाच आयोजित करीत आहोत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन तसेच अन्य लोकांच्या हितार्थ आम्ही या परिषदेत बहुव्यापकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिषदेचे अध्यक्ष सार्थक शिरोडकर यांनी सांगितले, की विद्यार्थी उद्यमशीलतेकडे आकृष्ट व्हावेत, हा या परिषदेचा हेतू आहे.

सारस्वत शिक्षण संस्थेचे सचिव रूपेश कामत यांनी शुभेच्छापर भाषणात उद्यमशीलता हा विषय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असल्याचे नमूद करून, विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:ता उद्योगव्यवसाय त्यायोगे सुरू करू शकतात, असे सांगितले.

अमोल बर्वे म्हणाले, युवावर्गासाठी आयोजित केलेला रोटरॅक्‍ट क्‍लबचा हा आगळावेगळा तथा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्योग जगतासंदर्भातील नवनवीन माहिती आणि संधी मिळणे आवश्‍यक असते. त्याबाबत या परिषदेच्या माध्यमातून कुणीतरी त्यांना दिशादिग्दर्शन करीत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. विविध प्रकारचे अडथळे उद्योग क्षेत्रात येतच असतात. ते कळण्यासाठी तसेच त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधितांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे या परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ज्ञानसंचय करण्याचा प्रयत्न युवकांनी तसेच विद्यार्थिवर्गाने करावा. या परिषदेतील स्टॉलस्मधून तुम्हाला विविध शासकीय खात्यांच्या योजनांची माहिती मिळेल. त्याचबरोबर त्यासंदर्भात उपलब्ध असलेल्या आर्थिक साहाय्याचीही माहिती मिळणार आहे.

उद्‌घाटन सत्राचे सूत्रनिवेदन श्रेयश कवळेकर यांनी केले. उद्‌घाटन सत्रानंतर दिलीप साळगावकर यांचे उपस्थितांसाठी विशेष मार्गदर्शनपर सत्र झाले. त्या अंतर्गत त्यांनी वार्तालापाद्वारे स्नेहसंवाद साधला.

 

संबंधित बातम्या