घटनास्थळचे पुरावे अक्षयाने केले नष्ट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण  

मेरशी पंच मृत्यू प्रकरण

संशयिताच्या अटकपूर्व अर्जावर गोवा खंडपीठात युक्तिवाद

पोलिसांनी प्रकाश नाईक याचा नैसर्गिक मृत्यूची नोंद केली असली तरी खुनाची शक्यता नाकारलेली नाही.

पणजी : मेरशीचे पंच प्रकाश नाईक याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मंत्र्यांचे बंधू संशयित विल्सन गुदिन्हो याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावरील सुनावणी आज झाली. प्रकाश नाईक याच्या घरी सर्वप्रथम हस्तक्षेप अर्जदार अक्षया गोवेकर हिने पोहचून घटनास्थळचे पुरावे नष्ट केल्यामुळे तिला अटक व्हायला हवी अशी बाजू संशयिताच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर मांडली.

हस्तक्षेप अर्जदार अक्षया गोवेकर हिने प्रकाश नाईक याच्या मोबाईल व्हटस्अप ग्रुपवरील मेसेज वाचून घरी धाव घेतली. हा मेसेज वाचून प्रकाश हा घरीच आहे हे तिला कसे कळले. प्रकाशच्या कुटुंबातील सर्व मंडळी त्या घटनेच्या दिवशी जवळच असलेल्या देवळात पुजेसाठी गेली होती. त्यामुळे तिने प्रथम देवळात जाऊन प्रकाश आहे का हे पाहायला हवे होते. तिने तसे न करता थेट घरी गेली. पोलिस येण्यापूर्वीच प्रकाश याला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तेथील पुरावे नष्ट झाले होते. संशयाची सुई अक्षया गोवेकर हिच्यावर येऊ शकते व त्या दिशेनेही पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे. पोलिसांनी प्रकाश याचा खून झाल्याची शक्यताही नाकारलेली नाही, असा युक्तिवाद ॲड. नितीन सरदेसाई यांनी संशयिताच्यावतीने केला.

पोलिसांच्यावतीने ॲड. प्रवीण फळदेसाई यांनी बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी संशयितांची पोलिस कोठडीची आवश्‍यकता आहे. त्याला अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी निवासस्थानी व इतर काही ठिकाणी छापे टाकले आहेत. तपासकामासाठी संशयिताच्या मोबाईलची चौकशी करायची आहे. मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या माहितीची पडताळणी करायची आहे. संशयित हे मंत्र्यांचे बंधू असले तरी पोलिस निःपक्षपातीपणे तपास करत आहेत, अशी बाजू त्यांनी मांडली. ही सुनावणी येत्या सोमवारी (१० फेब्रुवारी) ठेवताना अक्षया गोवेकर हिला लेखी बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिसांना घेतले फैलावर
प्रकाश नाईक याला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यासाठी आत्तापर्यंत पोलिसांनी काय प्रयत्न केले. तो पोलिसांना अजूनपर्यंत का सापडत नाही, अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलिसांना धारेवर धरले.

जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर

संबंधित बातम्या