माजी आमदार कुंकळ्येकरांविरुद्ध प्रदेशाध्यक्षांकडे करणार तक्रार..!

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

समाजमाध्यमात महापालिका आणि आपल्यावर माजी आमदार टीका करतात. परंतु आमदार मोन्सेरात हे भाजपामध्ये आहेत, आम्ही सर्वजण भाजमध्ये आहोत. त्यामुळे ही पक्षाची बदनामी होत आहे.

पणजी

महापालिका आणि आपल्यावर समाजमाध्यमातून माजी आमदारांनी (सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचे नाव न घेता) जो अपप्रचार सुरू केला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता असून, त्याद्वारे पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आमदार बाबूश मोन्सेरात यांना घेऊन प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली जाईल, अशी महिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
आमदार बाबूश मोन्सेरात भाजपमध्ये येण्यापूर्वी आपण पणजीच्या माजी आमदारांवर स्मार्ट सिटी आणि गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाच्या केलेल्या पैशाचा गैरव्यवहाराचा आरोप करीत आला आहे. आपली भूमिका अद्यापही तीच आहे. माजी आमदारांच्या काळात लोकांना आवश्‍यक असणाऱ्या गोष्टी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत होणे आवश्‍यक होत्या, पण त्या त्यांच्या काळात झालेल्या नाहीत. टाळेबंदीच्या काळात जनतेला मदत करण्यासाठी ते घराबाहेरही पडलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांकडे बोटे दाखवू नयेत. खऱ्या अर्थाने जनतेला सध्या मदतीची गरज होती, पण माजी आमदार घरी बसले होते, असा आरोपही मडकईकर यांनी केला.
माजी आमदारांच्या काळात झालेल्या कामांविषयी मडकईकर यांनी प्रश्‍न उपस्थित केले. लोकांना त्याचा किती फायदा झाला, हे त्यांनाच माहीत असे ते म्हणाले. समाजमाध्यमात महापालिका आणि आपल्यावर माजी आमदार टीका करतात. परंतु आमदार मोन्सेरात हे भाजपामध्ये आहेत, आम्ही सर्वजण भाजमध्ये आहोत. त्यामुळे ही पक्षाची बदनामी होत आहे. याविषयी आपण आमदार मोन्सेरात यांच्याकडे ही बाब मांडणार असून, त्यानंतर त्यांना घेऊन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले.
------------------------------
----------------------------
वास्तव समजून घ्या मगच बोला...
माजी आमदार कोणतीही पूर्ण माहिती न घेता आपल्यावर आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रथम सर्व माहिती घ्यावी. कारण आपण जी गाडी खरेदी केली आहे, ती ३५ लाखांची नसून २० लाखांच्या आतील आहे. माजी आमदारांनी इमेजिन पणजी स्मार्ट सिटीचे अध्यक्ष म्हणून काम करताना महापालिकेला कधीच विश्‍वासात घेतले नाही. त्यांनी जी कामे केली आहेत, ती सर्व अर्धवट सोडलेली आहेत. त्यामुळे वास्तव काय आहे, याचा पूर्ण अभ्यास करावा आणि नतरच बोलावे, असा उपरोधिक टोलाही महापौर मडकईकर यांनी लगावला.

संबंधित बातम्या