१७ केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरवात

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

राज्यात १८ हजार परीक्षार्थी : परीक्षेचा महिन्याचा कालावधी

राज्यातील एकूण १७ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. महिनाभर चालणाऱ्या या परीक्षेत अनेक विषयांच्या तारखेमध्ये अंतर ठेवण्यात आले आहे.

पणजी : गोवा राज्य उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एचएसएससी) २०२०-२१च्या परीक्षेस आजपासून सुरवात झाली. या परीक्षेक राज्यभरातून १८ हजार १३५ विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शांततेत परीक्षेला सुरवात झाली आहे.

एकूण परीक्षार्थींमध्ये ९ हजार ३२२ मुली आणि ८ हजार ८१३ मुलींचा समावेश आहे. २४ मार्च रोजी या परीक्षेचा समारोप होईल. सुमारे ५ हजार ५८८ विद्यार्थी वाणिज्य विभागातून परीक्षा देत आहेत. त्याशिवाय ५ हजार १११ विद्यार्थी विज्ञान शाखेतून परीक्षेला बसले आहेत. कला शाखेसाठी ४ हजार ५२१ आणि व्यावसायिक शिक्षणाचे २ हजार ९१५ विद्यार्थी आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षेला सुरुवात झाली.

यावर्षीपासून केंद्रांवर समुपदेशक आणि अत्यावश्‍यक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज सकाळी अनेक विद्यार्थ्यांचे पालक चारचाकी, दुचाकीवरून मुलांना परीक्षेच्या ठिकाणी सोडण्यासाठी आल्याचे चित्र दिसत होते. तर काही ठिकाणी सकाळी नऊ वाजताच केंद्रांवर दाखल झाली होती, त्याशिवाय काही मुले पुस्तकावर शेवटची नजरही टाकताना दिसत होती. बारावीच्या मुलांपेक्षा मुलींमध्ये या परीक्षेविषयी कमालीची उत्सुकता दिसून येत होती.

संबंधित बातम्या