नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली झर

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

डिचोलीतील नैसर्गिक जलस्रोतांचे अस्तित्व संकटात
सर्वणमधील झरीचा स्त्रोत आटला, संवर्धनाची गरज

नैसर्गिक जलस्रोत असलेल्या आणि एकेकाळी आंघोळीसाठी प्रसिध्द असलेल्या डिचोली तालुक्‍यातील सर्वण गावातील झरीचे अस्तित्व सध्या संकटात आले आहे. ही झर वाचवण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत, तर भविष्यात ती नामशेष होणार, यात शंकाच नाही. गावातील श्री श्‍यामपुरुष मंदिरासमोर साधारण 500 मीटर अंतरावर असलेल्या नैसर्गिक तळीपासून जवळच ही झर आहे.

डिचोली : खाण व्यवसाय म्हणा किंवा संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने डिचोली तालुक्‍यातील काही गावातील नैसर्गिक जलस्त्रोतांचे अस्तित्व संकटात आले असून, काही जलस्त्रोत नामशेष झाली आहेत. खाणपट्‌टा भागातील नैसर्गिक जलस्त्रोते नामशेष झाली असली, तरी डिचोलीतील काही भागातील नैसर्गिक जलस्रोत अद्यापही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यापैकीच सर्वण गावातील झर.
या झरीच्या पाण्याचा स्रोत हळूहळू कमी होत असल्याने, ती आता नामशेष होण्याच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. तशी भीतीही जाणकार व्यक्‍त करतात. या झरीवर स्थानिकांनीही आता पाठ फिरवल्याने झरीला अवकळा प्राप्त झाली आहे.

स्थानिकांची पाठ
झरीचा नेमका कधी आणि कोठून उगम झाला, हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत असला, तरी या झरीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अशी माहिती गावातील काही जाणकार वयस्क व्यक्‍तीकडून मिळाली आहे. एक काळ असा होता, की या झरीवर आंघोळीसाठी मुलांसह नागरिकांचा गर्दी उडायची असायचा. उन्हाळ्याच्या दिवसांनी तर रोज झरीवर गजबजाट असायचा.

या झरीच्या पाण्याने आंघोळ केल्यास कातीचे विकार बरे होतात. अशी या झरीची ख्याती असल्याने पूर्वी या झरीला वेगळे महत्व प्राप्त झाले होते. मात्र, या झरीच्या संवर्धनाकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने, हळूहळू माती साचून ही झर बुजत गेली. हळूहळू झऱ्याचा प्रवाहही कमी होत गेला. त्यामुळे गेल्या 25-30 वर्षांपासून तर स्थानिकांनी या झरीकडे पाठ किरवली आहे. सध्या तर या झरीतील पाणी आटल्याने त्यात धड आंघोळही करणे मुश्‍किल बनले आहे. या झरीच्या संवर्धनासाठी स्थानिक पंचायत वा जलसंपदा खात्याने वेळीच उपाययोजना हाती घेतली नाही, तर झर नामशेष होणार, यात शंकाच नाही.

प्रस्ताव अडला
या झरीचा विकास करण्याच्या उध्देशाने या भागाचे माजी आमदार अनंत शेट यांच्या प्रयत्नामुळे पाच वर्षापुर्वी गत पंचायत मंडळाच्या कार्यकाळात जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी या झरीची पाहणी केली होती. झरीच्या विकासाचा प्रस्ताव तयार करुन जलसंपदा खात्याकडे पाठवण्याची सूचनाही स्थानिक पंचायतीला करण्यात आली होती. मात्र, विकासाचा प्रस्ताव प्रत्यक्ष मार्गी लागला नाही. तो का अडला, हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे.

'मर्त्याची झर'नामशेष
झरीचा उगम कधी झाला, ते माहित नाही. मात्र, आमच्या आजोबा-पणजोबाच्या काळापूर्वीपासून झरीचे अस्तित्व आहे. या झरीच्या पाण्यात अनेक गुणधर्म आहेत. पाण्याने आंघोळ केल्यास कातीचे विकार बरे होतात. तीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याच झरीला टेकून
'मर्त्याची झर' या नावाने ओळखण्यात येणारी अन्य एक झर होती. मात्र तिचे अस्तित्व नष्ट झाल्यास शंभर वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. तिच्या अस्तित्वाच्या आता खाणाखुणाही आढळून येत नाहीत. अशी माहिती जाणकारांकडून समोर आली आहे.

संबंधित बातम्या