पोळेत दीड कोटीच्‍या जुन्‍या नोटा जप्‍त

Dainik Gomantak
शनिवार, 11 जानेवारी 2020

पाच केरळीयनांना तपासणी नाक्‍यावर अटक : काणकोण पोलिसांची कारवाई

सुभाष महाले

काणकोण

पोळे तपासणी नाक्यावर एक कोटी ४८ लाख रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्‍त केल्‍या. या नोटा एक हजार रुपयांच्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कासरकोड - केरळ येथील पाच संशयितांना अवैद्य नोटा, तसेच केएल १४ यू ३३३० या क्रमांकाच्‍या चारचाकीसह ताब्‍यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वा.च्‍या सुमारास करण्‍यात आली. नोटांनी भरलेली गाडी गोव्यातून केरळच्या दिशेने जात होती. या व्यवहारात गोव्यातील काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
काणकोण पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्‍ये अब्दुल कादर, सलिम अब्दुल रेहमान, रसक इब्राहिम महमद, अबूल सिद्धकी, युसूफ अब्दुल रेहमान यांचा समावेश आहे. पोळे तपासणी नाक्यावरील सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत वेळीप यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक रामचंद्र नाईक हे पुढील तपास करीत आहेत. संशयितांकडे जुन्या एक हजार नोटांसंदर्भात कुठलीच कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितले. या सर्व संशयितांना आज संध्याकाळी काणकोण प्रथम सत्र न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने चौकशीसाठी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

.....कॉन्‍स्‍टेबल भगवान सावंत याची कामगिरी...
या संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोळे तपासणी नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलिस शिपाई भगवान सावंत यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमाकांत वेळीप हे उपस्थित होते. गाडी चेक नाक्यावर येताच सावंत यांनी गाडीची झडती घेतण्यास आरंभ केला. त्यावेळी संशयितांनी त्यांना दीड लाख रुपयांची लाचही देऊ केली. मात्र, सावंत यांनी गाडीची झडती घेऊन झाला प्रकार वरिष्ठांना सांगितला त्याबद्धल त्यांचे काणकोणात कौतुक करण्यात येत आहे.

तर कॉन्स्टेबलवर
होऊ शकते कारवाई

पोळे तपासणी नाक्यावर चलनातून बंद झालेल्या १ हजार रुपयांच्या सुमारे दीड कोटीच्या नोटा जप्त करण्यात कारवाई केलेल्या पोलिस कॉन्स्टेबल भगवान सावंत याने कारवाईची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईबाबत प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. काणकोण पोलिस निरीक्षक त्याला मेमो देऊन त्याच्याकडून स्पष्टीकरण मागतील व त्यांनी अहवाल सादर केल्यावर त्यात काही दोष आढळून आल्यास कारवाई होऊ शकते. तपासणी नाक्यावरील कारवाई ही पोळे तपासणी नाक्यावर असलेल्या एकत्रित पोलिसांची असताना व वरिष्ठांना न विचारता सोशल मीडियावर पोस्ट टाकणे योग्य नाही, असे मत केपेचे पोलिस उपविभागीय अधिकारी किरण पौडवाल यांनी व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या