शेतकर्यांच्या मागण्या पुर्ण झाल्यानंतरच खनिज माल उचलावा  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

वाळपई:मागण्या पूर्ण झाल्यानंतरच खनिज माल उचला
वाळपई येथे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची मागणी

वाळपई:मागण्या पूर्ण झाल्यानंतरच खनिज माल उचला
वाळपई येथे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची मागणी
पिसुर्ले-सत्तरी भागातील खाण व्यवसायामुळे शेती नष्ट झाली आहे.या पिसुर्ले भागात भात शेतीत खनिज गाळ साचून राहिला आहे.तो गाळ काढावा.खंदकातील पाणी शेती, बागायतीला पुरविणे. २०१७ पासूनची नुकसान भरपाई मिळावी, अशा तीन मागण्या शेतकऱ्यांनी खनिज कंपन्यांकडे केल्या होत्या.पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.मागील काही दिवसांपूर्वी डंप केलेला खनिज माल उचलण्याच्या हालचाली कंपन्यांनी सुरू केल्या होत्या.त्याला विरोध करीत आधी आमच्या मागण्या पूर्ण करा, नंतरच खनिज माल उचलावा, अशी भूमिका घेत पिसुर्लेतील शेतकऱ्यांनी वाळपई उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनाची दखल घेत उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यांनी कार्यालयात आज बैठक घेतली.यावेळी शेतकरी वर्गाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत.तोपर्यंत खनिज माल कंपन्यांनी उचलू नये, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.बैठकीला उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, मामलेदार अनिल राणे सरदेसाई, तसेच पिसुर्लेतील शेतकरी हनुमंत परब, पंच देवानंद परब, पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर, सेसा कंपनीचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होते.
शेतकरी हनुमंत परब म्हणाले, २०१७ सालापासून खनिज कंपन्यांनी शेतीची नुकसान भरपाई दिली नाही.ती देणे आवश्यक आहे.तसेच खनिज खाणीच्या क्षेत्रात मोठे खंदक आहेत.या खंदकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिलेले आहे.ते पाणी शेती, बागायतीसाठी पुरविले गेले नाही.तसेच पाणी भरलेले असल्याने हे खंदक धोक्याचे बनलेले आहे.या भागात जवळ घरांची वस्ती आहे.या खंदकातील दरडीची माती कोसळण्याची भिती आहे.या दरडी कोसळत राहिल्यास खंदक बुजणार आहेत.म्हणूनच हे पाणी उपसले पाहिजे.शेती, बागायतीसाठी, गायींना पिण्यासाठी पुरविले तर फायद्याचे आहे. ही सर्व कामे खनिज कंपन्यांनी केले पाहिजे, असे परब म्हणाले.
पंच देवानंद परब म्हणाले, आपण या समस्येकडे नेहमीच लक्ष घालून आहे. गतवर्षी खनिज खंदकातील पाणी पुरविले होते.पण ते व्यवस्थित पोहचले नाही.म्णून या खंदकातील पाणी व्यवस्थितपणे लोकांना पुरविण्याची व्यवस्था आवश्यक आहे.पाणी पुरविले तर खंदकाचा धोका टळणार आहे.कारण या खंदकातील पाणी तुडुंब भरलेले आहे.उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर म्हणाले आपण पिसुर्ले भागात येत्या आठवड्यात भेट देऊन परिस्थितीची पहाणी करणार असून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार आहोत, असे स्पष्ट केले.

कसिनो हा पर्यटनाचाच भाग

संबंधित बातम्या