जगप्रसिद्ध फॅशन डिझाइनर वेंडल रॉड्रिग्स यांचे निधन

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

वेंडल रॉड्रिग्स कालवश 

कोलवाळ येथील सेंट फ्रांसिस ऑफ आसीस चर्चच्या दफनभूमीत गुरुवार ता. १३ रोजी सायं. ४ वा. त्यांच्यावर दफनविधी करण्यात येतील. मुंबई, दुबई इत्यादी ठिकाणची त्यांची नातेवाईक मंडळी गुरुवारी सकाळी कोलवाळमध्ये पोहोचणार आहेत. त्यांना तीन भाऊ असून त्यांचे वास्तव मुंबई व दुबईत आहे. वर्ष २००२ मध्ये पॅरिसमध्ये नागरी पद्धतीने ते एका पुरुषाशी विवाहबद्ध झाले होते.
वेंडल यांना स्वत:च्या कोलवाळ गावचा नितांत अभिमान होता.

म्हापसा : जगविख्यात फॅशन डिझाइनर पद्मश्री वेंडल रॉड्रिग्स (५९) यांचे  बुधवारी सायंकाळच्या सुमारास कोलवाळ येथील राहत्या घरी निधन झाले. व्यवसायानिमित्त त्यांचे देश - विदेशात नेहमीच दौरे असायचे; तथापि, मागच्या नाताळ उत्सवानंतर त्यांचा आजार बळावल्याने ते घरीच होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी दररोज त्यांच्या घरी डॉक्‍टर यायचे. दुपारी जेवण घेतल्‍यानंतर सुमारे २ वा.च्‍या सुमारास ते झोपले होते. सायं. ४.३० वा.च्या सुमारास घरची मंडळी त्यांना उठवायला गेली असता त्यांचे निधन झाल्याचे आढळून आले.

तसेच, वारशासंदर्भातही त्यांना अभिमान होता. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या वडिलोपार्जित घराचे म्युझियम केले होते व स्वत: त्याच गावातील एक जुने घर घेऊन व ते दुरुस्त करून ते त्यात राहत होते. कोलवाळ गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी ते शिष्यवृत्तीही देत होते. स्वत:चे वडील फेलिक्स रॉड्रिग्स यांच्या नावाने त्यांनी पंचायत संकुलात एक व्यायामशाळा सुरू केली होती.

सामाजिक चळवळीतही योगदान
सामाजिक चळवळीतही ते सातत्याने क्रियाशील होते. तृतीयपंथीयांच्या बाजूने झालेल्या चळवळीतही त्यांचे योगदान आहे. काही दिवसांपूवीं चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणानिमित्त त्या मार्गालगतची घरे व बांधकामे मोडली जात असताना, कोलवाळ येथील कपेल त्याअंतर्गत मोडले जाऊ नये यासाठी झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. ते कपेल अजूनही तिथेच आहे. तसेच पर्यारवणरक्षणाच्या कार्यातही त्यांनी थोडेफार योगदान दिले होते. आम्यानी कोलवाळ येथील जुनाट आम्रवृक्ष कापले जाऊ नयेत, यासाठी झालेल्या चळवळीतही ते सहभागी झाले होते. वर्ष २०१४ मध्ये त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता. विविध नामवंत चित्रपट अभिनेत्यांसाठी ते फॅशन डिझायनिंगचे काम करून देत असल्याने चित्रपटसृष्टीतही त्यांचा नावलौकिक होता.

पर्यावरणपूरक वारशाचा अधिष्‍ठान हरपले
वेंडल रॉड्रिग्‍ज यांना पर्यावरणपूरक तथा वारशाचे अधिष्ठान संवर्धन करण्‍याची आवड होती. त्‍यासंबंधी निगडित असलेले फॅशन डिझायनिंग यावर ते भर द्यायचे. वर्ष २०१२ मध्ये त्यांचे गोमंतकीय वस्त्रप्रावरणे या विषयावरील पुस्तक प्रकाशित झाले. त्याच वर्षी त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले. तसेच वर्ष २०१७ मध्ये त्यांची कादंबरीही प्रसिद्ध झाली. अभिनय, लेखन, पाककला हे त्यांच्या आवडीचे विषय होते.

त्यांचा जन्म २८ मे १९६० रोजी एका ख्रिस्ती कुटुंबात झाला होता. त्यानंतर त्यांचे मुंबईत बालपण गेले. माहीम मुंबई येथील सेंट मायकल हायस्कुलात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर त्‍यांनी कॅटरिंगमधील पदविका मिळवली व ते विदेशात मस्कत शहरात ऑफिसर्स क्‍लबमध्ये १९८२ पासून नोकरी करू लागले. पण, त्या नोकरीत त्यांचे मन लागेना. त्यानंतर त्यांनी विदेशात काही ठिकाणी फॅशन डिझायनिंग तसेच तत्सम विषयांचे शिक्षण घेतले व नंतर त्या व्यवसायात स्थिरस्थावर होऊन अखेरीस जागतिक स्तरावरही नावलौकिक संपादन केला.
मान्‍यवरांकडून श्रद्धांजली
जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि मूळ गोमंतकीय पद्मश्री वेंडल रॉड्रिक्स यांच्या अचानक निधनाने आपल्‍याला धक्का बसला आहे. त्यांच्या अनुकरणीय कार्याने फॅशनच्या जगात त्यांनी एक अतुल्य छाप सोडली आहे.
-डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री
माझा अतिशय चांगला मित्र आणि डिझाइनर, वेंडल रॉड्रिग्ज यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून मनापासून दु:खी झालो. त्यांचे कार्य आणि कौशल्य यांचे स्थान उच्च आहे. त्यांच्या कुटुंबियांना मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
-विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

ख्यातनाम फॅशन डिझायनर पद्मश्री वेंडल रॉड्रिग्ज यांचे निधन झाल्याचे ऐकून तीव्र धक्का बसला. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. वेंडल यांच्या आत्म्यास शांती लाभो.
- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
वेंडल यांच्‍या निधनामुळे बसलेला धक्का व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडत आहेत. आमचे सहकारी, गोमंतकीय वेंडल रॉड्रिग्ज यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. त्यांनी जगाच्या नकाशावर गोवा नेला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार
 

संबंधित बातम्या