लोबेरांच्या अनुपस्थितीत एफसी गोवाची परीक्षा  

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

एफसी गोवा संघाच्या मध्यफळीत अहमद जाहू याच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा असेल.

फातोर्डा येथे आज हैदराबादशी लढत; अव्वल स्थान पुन्हा मिळविण्याचे लक्ष्य

 

पणजी: सर्जिओ लोबेरा यांना डच्चू देत त्यांना पुन्हा स्पेनमध्ये पाठविण्यात आले आहे. माजी मुख्य प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळताना एफसी गोवा संघाची परीक्षा लागेल. बुधवारी (ता. ५) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमान संघासमोर तळाच्या हैदराबाद एफसीचे आव्हान असेल.

आयएसएस स्पर्धेत सध्या एफसी गोवा संघ ३० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अव्वल स्थानी असलेल्या एटीके एफसीचेही तेवढेच गुण आहेत. एफसी गोवा संघाने लोबेरा डच्चू प्रकरण मागे सारत जोमदार खेळ करून पूर्ण तीन गुण प्राप्त केले, तर गोव्याचा संघ कोलकात्यातील संघावर तीन गुणांची आघाडी मिळवेल. आघाडीवरील स्थानामुळे एएफसी चॅम्‍पियन्स लीग स्पर्धेत खेळण्याची संधी लाभणार आहे, त्यामुळे एफसी गोवासाठी गुणतक्त्यात अग्रस्थान महत्त्वपूर्ण असेल. हैदराबादची कामगिरी खराब आहे. त्यांनी फक्त सहा गुण नोंदविले असून ते तळाच्या स्थानावर आहेत.

हैदराबादविरुद्ध उद्या एफसी गोवा संघ नव्या मार्गदर्शक संचासह मैदानात उतरेल. डेरिक परेरा संघाचे तांत्रिक संचालक, तर क्लिफर्ड मिरांडा प्रभारी प्रशिक्षक आहेत. लोबेरा यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये क्लिफर्ड मिरांडा सहाय्यक प्रशिक्षक होते, तर डेरिक यांनी २०१७-१८ मोसमात लोबेरा यांचे सहाय्यक या नात्याने काम पाहिले आहे. साहजिकच एफसी गोवा संघातील सध्याचे खेळाडू डेरिक व क्लिफर्ड यांना नवे नाहीत.
डेरिक परेरा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, संघ एकत्र ठेवण्यावर मी लक्ष केंद्रीत केले आहे. नेहमीच सांघिक खेळ करायचा, एका वेळी एका सामन्याचा विचार करायचा असे धोरण आहे. आमच्या संघात गुणवत्ता आहे, पण दृष्टिकोन योग्य असला पाहिजे. मी मैदानावर पाऊल टाकले तेव्हा खेळाडूंमध्ये सकारात्मक उर्जा असल्याचे जाणवले. परिस्थितीचा विचार करता मला खेळाडूंचा आदर वाटतो. त्यांनी सरावासाठी योग्य प्रतिसाद दिला. प्रत्येक दिवशी खेळाडूंचा दृष्टिकोन असाच राहिला आहे आणि याचे समाधान वाटते.

एदू बेदिया निलंबित असल्यामुळे उद्या तो एफसी गोवा संघात नसेल, अहमद जाहू संघात परतणार असल्यामुळे यजमान संघाची ताकद वाढली आहे. फेरान कोरोमिनास आक्रमणातील प्रमुख अस्त्र असेल. एफसी गोवातर्फे आयएसएल स्पर्धेत ५० गोल केलेल्या या हुकमी स्ट्रायकरने यंदाच्या स्पर्धेत ९ गोल नोंदविले आहेत. हैदराबादला एकदाही क्लीन शीट राखता आलेली नाही ही प्रशिक्षक जेव्हीयर लोपेझ यांच्यासाठी सर्वाधिक चिंतेची बाब आहे. त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक ३३ गोल झाले आहेत. जानेवारीत खेळाडूंच्या बदल्यांच्या कालावधीत हैदराबादने काही खेळाडू लोनवर दिले, तर सौविक चक्रवर्ती आणि हितेश शर्मा असे काही खेळाडू मिळविले.

 

अनागोंदी, तरीही सरकारकडून अभय!

मैदानात उतरण्यापूर्वी...
-एफसी गोवा : १५ सामने, ९ विजय, ३ बरोबरी, ३ पराभव, ३२ गोल नोंदविले, २० गोल स्वीकारले, ३० गुण
-हैदराबाद एफसी : १५ सामने, १ विजय, ३ बरोबरी, ११ पराभव, १४ गोल नोंदविले, ३३ गोल स्वीकारले, ६ गुण
-पहिल्या टप्प्यात : ८ डिसेंबर २०१९ रोजी हैदराबाद येथे एफसी गोवा १-० फरकाने विजयी
-यंदाच्या मोसमात होम (फातोर्डा) मैदानावर एफसी गोवा : ७ सामने, ५ विजय, १ बरोबरी, १ पराभव, १४ गोल नोंदविले, ५ गोल स्वीकारले, १६ गुण

सध्याची परिस्थिती काहीही असली, तरी त्याचा खेळाडूंवर काहीएक परिणाम होणार नाही. आम्ही सर्व जण
व्यावसायिक आहोत आणि एफसी गोवाच्या प्रगतीसाठी लढणार आहोत.
-कार्लोस पेना
एफसी गोवाचा स्पॅनिश बचावपटू

 

संबंधित बातम्या