एफसी गोवाची शतकी मजल

Dainik Gomantak
गुरुवार, 9 जानेवारी 2020

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी संध्याकाळी झालेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सामना एफसी गोवासाठी खास ठरला. स्पर्धेतील त्यांचा तो शंभरावा सामना होता आणि नॉर्थईस्ट युनायटेडला दोन गोलांनी हरवून ही लढत संस्मरणीय ठरविली.

किशोर पेटकर
पणजी

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी संध्याकाळी झालेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सामना एफसी गोवासाठी खास ठरला. स्पर्धेतील त्यांचा तो शंभरावा सामना होता आणि नॉर्थईस्ट युनायटेडला दोन गोलांनी हरवून ही लढत संस्मरणीय ठरविली.
मिस्लाव कोमोर्स्की याचा स्वयंगोल व फेरान कोरोमिनासचा पेनल्टी गोल यामुळे एफसी गोवास विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाले. या लढतीविषयी एफसी गोवाचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी सामन्यानंतर सांगितले, की ‘‘आज आम्ही कठीण सामना खेळलो असं मला वाटतं. कारण, नॉर्थईस्टने खूपच भक्कम बचाव केला. आज मैदानावर जागा शोधणे आणि संधी मिळविणे खूपच कठीण जात होते, इतर लढतीत अशी परिस्थिती नव्हती. अखेरीस आम्ही पूर्ण तीन गुण मिळविले हेच महत्त्वाचे आहे. सध्या आम्ही अव्वल आहोत. एटीकेविरुद्धचा पुढील सामना महत्त्वाचा आहे ही बाब ध्यानात ठेवायला हवी.’’
एफसी गोवाने नॉर्थईस्टला नमवून १२ सामन्यांतून गुणसंख्या २४वर नेली आहे. २१ गुण असलेल्या एटीकेवर त्यांनी तीन गुणांची आघाडी मिळविली आहे. एटीकेविरुद्धच्या पुढील सामन्याविषयी लोबेरा यांनी सांगितले, की ‘‘एटीके हा खूप चांगला संघ आहे. त्याच्याकडे मुबलक चांगले खेळाडू असून त्यांनी मजबूत संघ बांधणी केली आहे. तो सामना कठीण असेल याची मला अपेक्षा आहे, पण माझा खेळाडूंवर आणि संघावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे सामना जिंकणे शक्य आहे. त्या सामन्याच्या तयारीसाठी आम्हाला १० दिवस मिळत आहेत. कोलकात्यात तीन गुण मिळण्याची अपेक्षा आहे, जे आमच्यासाठी मोठे पाऊल असेल.’’ एफसी गोवाची एटीकेविरुद्धची लढत १८ जानेवारीस खेळली जाईल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे १४ डिसेंबर रोजी एटीके संघाविरुद्ध एफसी गोवाने २-१ फरकाने विजय मिळविला होता.
स्पॅनिश लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा आयएसएल स्पर्धेत २०१७-१८ मोसमापासून खेळत आहे. गतमोसमात एफसी गोवा संघ उपविजेता ठरला होता. स्पर्धेच्या पहिल्या तीन मोसमात २०१४ ते २०१६ या कालावधीत ब्राझीलचे झिको एफसी गोवा संघाचे मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा २०१५ मध्ये उपविजेता ठरला होता. २०१६ मोसमाचा अपवाद वगळता एफसी गोवाने चार वेळा स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी गाठली आहे.

आयएसएलमधील `शतक`वीर एफसी गोवा
मोसम सामने विजय बरोबरी पराभव गोल केले गोल घेतले
२०१४ १६ ६ ६ ४ २१ १२
२०१५ १७ ८ ४ ५ ३४ २४
२०१६ १४ ४ २ ८ १५ २५
२०१७-१८ २० ९ ४ ७ ४३ ३२
२०१८-१९ २१ ११ ४ ६ ४१ २३
२०१९-२० १२ ७ ३ २ २५ १४
एकूण १०० ४५ २३ ३२ १७९ १३०

संबंधित बातम्या