बुमूसमुळे एफसी गोवा विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजीः सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना ह्यूगो बुमूस याने नोंदविलेल्या सामन्यातील वैयक्तिक दुसऱ्या गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने शनिवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सचे कडवे आव्हान ३-२ असे निसटते परतावून लावले. या विजयासह गतउपविजेत्यांनी गुणतक्त्यात पुन्हा एकदा अग्रस्थान मिळविले आहे.

पणजीः सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना ह्यूगो बुमूस याने नोंदविलेल्या सामन्यातील वैयक्तिक दुसऱ्या गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने शनिवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सचे कडवे आव्हान ३-२ असे निसटते परतावून लावले. या विजयासह गतउपविजेत्यांनी गुणतक्त्यात पुन्हा एकदा अग्रस्थान मिळविले आहे.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेला सामना रंगतदार ठरला. फ्रेंच खेळाडू बुमूस याने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल केला. पहिला गोल त्याने २६व्या मिनिटास मंदार राव देसाईच्या असिस्टवर नोंदविला. नंतर ४५व्या मिनिटास जॅकिचंद सिंगने एफसी गोवा आघाडी २-० अशी वाढविली. हा गोल फेरान कोरोमिनासच्या पासवर झाला.

केरळा ब्लास्टर्सने उत्तरार्धात जोरदार मुसंडी मारली. १६ मिनिटांत दोन गोल नोंदवून त्यांनी एफसी गोवास २-२ असे बरोबरीत गाठले. कॅमेरूनच्या राफेल मेस्सी बौली याने ५३व्या बार्थोलोमेव ओगबेचे याच्या असिस्टवर केरळच्या संघाची पिछाडी एका गोलने कमी केली. नायजेरियात जन्मलेल्या बार्थोलोमेव ओगबेचे याने ६९व्या मिनिटास सर्जिओ सिदोंचा याच्या पासवर गोल केल्यामुळे एफसी गोवा संघाच्या गोटात खळबळ माजली. मात्र ८७व्या मिनिटास बुमूस याने अहमद जाहू याच्या असिस्टवर सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा विजय निश्चित करणारा गोल केला. नंतरची सात मिनिटे, तर इंज्युरी टाईममधील पाच मिनिटांच्या खेळात एफसी गोवाने आघाडी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.

एफसी गोवाचा हा १४ लढतीतील आठवा विजय ठरला. त्यांचे आता २७ गुण झाले आहेत. गतविजेत्या बंगळूर एफसीवर (२५ गुण) दोन गुणांची आघाडी घेत गोव्याच्या संघाने अग्रस्थान मिळवत प्ले-ऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. एटीके एफसीचे १३ सामन्यांतून २४ गुण असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एल्को शाट्टोरी यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सची निराशाजनक मोहीम कायम राहिली. त्यांना १४ लढतीत सहावा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे १४ गुण आणि आठवा क्रमांक कायम राहिला.

दृष्टिक्षेपात सामना
- ह्युगो बुमूसचे आता यंदाच्या आयएसएल स्पर्धेत ६ गोल
- घरच्या मैदानावर एफसी गोवाचे यंदा ७ लढतीत ५ विजय
- फातोर्ड्यात एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात ६ लढती, त्यात यजमानांचे ५ विजय
- आयएसएल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या १२ पैकी ८ लढतीत एफसी गोवा विजयी

संबंधित बातम्या