राज्यातील सात जलमार्गावर फेरीबोट सुरू

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

सध्या सामाजिक अंतर राखण्याच्या अटीमुळे एका फेरीबोटीत चारचाकी वाहने नसतील तर १५ ते १६ दुचाक्या बसतात. पूर्वी २० ते २४ दुचाक्या फेरीबोटीतून जात असत, परंतु आता ते शक्य होणार नाही.

पणजी

नदी परिवहन खात्याच्यावतीने राज्यभर दुचाकी आणि इतर प्रवाशांसाठी १८ ठिकाणी जलमार्गावर फेरीबोटी चालविल्या जातात. टाळेबंदीच्या काळात अठरापैकी सात ठिकाणीच फेरीबोटी सुरू आहेत. या फेरीबोटीत सध्या सामाजिक अंतर ठेवून दुचक्या ठेवल्या जात असल्याने एकावेळी १५ दुचाक्या नेण्यात येत आहेत. जर टाळेबंदी उठली आणि सुरक्षेचा उपाय म्हणून जर सामाजिक अंतराचा पर्याय राज्य सरकारने स्वीकारला तर फेरीबोटीवर पूर्वीसारखी वाहनांची गर्दी दिसणार नाही.
टाळेबंदीच्या काळात इतर वाहतूक बंद ठेवली असली तरी नदी परिवहन खात्याने अत्यावशक सेवा म्हणून मोजक्याच मार्गावर फेरीबोटी सुरू ठेवल्या होत्या. परंतु आता राज्य सरकारने सरकारी कार्यालये सुरू केल्याने परिवहन खात्याने सहा मार्गावरील फेरीबोटी सुरू केलेल्या आहेत. राज्यभरात खात्यातर्फे १८ ठिकाणी फेरीबोट सेवा सुरू आहे. त्यातील सात ठिकाणच्या ज्या सेवा सुरू केल्या आहेत, त्या मार्गावरून सरकारी नोकरदारांची ये-जा मोठ्‍या प्रमाणात होत असते, हे मार्ग अनेकांना सोयीचे आहेत.
फेरीबोटीत पूर्वी दुचाक्यांची मोठी गर्दी नजरेस पडत होती. परंतु सध्या सामाजिक अंतर राखण्याच्या अटीमुळे एका फेरीबोटीत चारचाकी वाहने नसतील तर १५ ते १६ दुचाक्या बसतात. पूर्वी २० ते २४ दुचाक्या फेरीबोटीतून जात असत, परंतु आता ते शक्य होणार नाही. जर राज्य सरकारने सामाजिक अंतर व मास्कचा वापर या अटी यापुढे काही महिन्यांसाठी स्वीकारल्या तर फेरीबोटीवर वाहनांची गर्दी अजिबात दिसणार नाही, शिवाय लोकांनाही शिस्त लागण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. वेळेपूर्वी येणे, फेरीबोट लवकर सोडण्याचा आग्रह धरणे वगैरै प्रकार घडणार नाहीत, असे या खात्याच्या अधिकाऱ्यांना वाटते. जे बारा मार्ग बंद आहेत, त्या ठिकाणचे कर्मचारी नियमितपणे कामावर येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. '

--------------------
चौकट करा...
सध्या सुरू असलेले फेरीबोटीचे मार्ग
१) रायबंदर-चोडण
२) जुने गोवा-दिवाड
३) नार्वे- दिवाड
४) वाशी-दिवाड
५) पोंबुर्फा-चोडण
६) आडपई- रासई
७) वळवई-सुर्ला
---------------------
----------------------
चौकट करा...
टोंक-सारमानस आजपासून फेरीबोट...
सरकारी कर्मचारी आणि सध्या कारखाने सुरू झाल्याने त्या कामगारांची सोय म्हणून नदी परिवहन खात्याने डिचोली तालुक्यातील टोंका ते सारमानस ही फेरीबोट सेवा उद्या, बुधवारपासून काही मर्यादित वेळेत सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा सुरू करावी म्हणून आलेल्या विनंतीनुसार खात्याने हा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ही फेरीबोट सेवा सुरू राहणार आहे.

संबंधित बातम्या